नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात मद्यपींकडून विदेशी मद्य व बिअरची मागणी वाढल्याचे चित्र समोर आले आहे. एप्रिल २०२२ ते जानेवारी २०२३ च्या तुलनेत एप्रिल २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत बिअरच्या मागणीत ८.६९ टक्के आणि विदेशी मद्याच्या मागणीत ७.०८ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. तसेच वाइनमध्ये १.४२ टक्के, तर देशी मद्यात ०.०४ टक्के मागणीत घट नोंदवण्यात आली आहे.
शासनाच्या तिजोरीत मद्यप्रेमींकडून मोठ्या प्रमाणात महसूल जमा होतो. त्यामुळे मद्यविक्री वाढल्यास महसुलातही वाढ होते. दरवर्षी मद्यविक्री व महसुलात वाढ होत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, देशी मद्याची सर्वाधिक विक्री होत असल्याचे उघड झाले असून, त्याखालोखाल विदेशी, त्यानंतर बिअर व त्यानंतर वाइनची विक्री होत आहे. चालू आर्थिक वर्षात १ कोटी ९३ लाख१९ हजार ५१३ लिटर देशी मद्य विक्री करण्यात आले आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या तुलनेत मागील वर्षी ६ हजार ९१६ लिटर देशी मद्यची विक्री कमी झाली आहे. तर २०२२-२३ च्या तुलनेत मागील आर्थिक वर्षी विदेशी मद्यात ७ लाख ६६ हजार ०२८ लिटरची विक्री जास्त झाली आहे. चालू वर्षात १ कोटी १५ लाख ९१ हजार ५८७ लिटर विदेशी मद्यविक्री झाली आहे. तर बिअरच्या विक्रीतही ८ लाख ८९ हजार ३५८ लिटर वाढ नोंदवण्यात आली असून, चालू आर्थिक वर्षात १ कोटी ११ लाख २२ हजार २७७ लिटरची बिअर विक्री झाली आहे. तर वाइनच्या विक्रीत ११ हजार १७८ लिटर वाइनच्या विक्रीत घट झाली आहे. चालू वर्षात ७ लाख ७७ हजार ९४७ लिटर वाइन विक्री झाली आहे.
मद्याची मागणी (लिटरमध्ये)
मद्यप्रकार २०२२-२३ २०२३-२४
देशी १,९३,२६,४२९ १,९३,१९,५१३
विदेशी १,०८,२५,५५९ १,१५,९१,५८७
बिअर १,०२,३२,९१९ १,११,२२,२७७
वाइन ७,८९,१२५ ७,७७,९४७
सर्वाधिक मद्य रिचवले
ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत मद्यपींकडून देशी, विदेशीसह बिअरला सर्वाधिक मागणी असल्याचे दिसून आले आहे. डिसेंबर २०२३ मध्ये सर्वाधिक २० लाख ४४ हजार ६२७ लिटर देशी मद्यविक्री झाले. तर नोव्हेंबर २०२३ मध्ये १३ लाख ४४ हजार १०५ लिटर विदेशी मद्याची विक्री झाली. तसेच मे २०२३ मध्ये १६ लाख ८६ हजार ९७९ लिटर सर्वाधिक बिअर रिचवण्यात आली आहे. तर डिसेंबर २०२३ मध्ये ९२ हजार ५४४ लिटर वाइन मद्यपींनी रिचवली आहे.
The post वर्षभरात विक्रीत आठ टक्क्यांनी वाढ, देशी जैसे थे, वाइनच्या मागणीत घट appeared first on पुढारी.