वर्षभरापासून पालिकेची एचआरसीटी यंत्रे धूळखात! शिवसेनेचे आयुक्तांना निवेदन 

नाशिक : महापालिकेच्या नवीन बिटको रुग्णालयात गेल्या वर्षाच्या सुरवातीला एचआरसीटी यंत्रे खरेदी करूनही फक्त तंत्रज्ज्ञ व आवश्‍यक सुविधा उपलब्ध करून न दिल्याने ती धूळखात पडून आहे. त्याचबरोबर २३ व्हेंटिलेटरचीही दयनीय अवस्था झाली आहे. कोरोना काळात नागरिक उपचारासाठी खासगी रुग्णालयाकडे धाव घेत असताना पालिकेने दुर्लक्ष केल्याचा प्रकार शिवसेनेने समोर आणताना सार्वजनिक आरोग्य सेवेबाबतची प्रशासनाची उदासीनतेवर टीका केली आहे. 

वर्षभरापासून पालिकेची एचआरसीटी यंत्रे धूळखात 
कोरोना काळात महापालिकेतर्फे तातडीची बाब म्हणून यंत्रे खरेदी करण्यात आली. नव्याने कोविड सेंटर, रुग्णालये उभारली, मानधनावर वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, तंत्रज्ञ यांची भरती करण्यात आली. परंतु एवढे करूनही फुफ्फुसाची तपासणी करण्यासाठीचे एचआरसीटी मशिन सिंहस्थ निधीतून जानेवारी २०२० मध्ये खरेदी करूनही तसेच पडून आहे. रुग्णांना एकाच छताखाली सुविधा मिळणे आवश्यक असताना रक्त तपासणी, स्कॅन करणे आदीसांठी वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागल्यामुळे कोरोनाबाधित रुग्ण तसेच नातेवाईक यांना मनस्ताप झाल्याचा आरोप शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आयुक्त कैलास जाधव यांना निवेदन देताना केला.

हेही वाचा > संतापजनक प्रकार! शेजारीणच झाली वैरीण; 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला दिले नराधमांच्या ताब्यात

आरोग्य यंत्रणा तत्पर ठेवण्याची मागणी

कोरोनाचा नवीन स्ट्रेन्स आढळल्याने रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे. कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता आरोग्य यंत्रणा तत्पर ठेवण्याची मागणी करण्यात आली. आरोग्य यंत्रणा सक्षम न झाल्यास आंदोलनाचा इशारा या वेळी देण्यात आला. विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, गटनेते विलास शिंदे, नाशिक रोड प्रभाग समिती सभापती जयश्री खर्जुल, नगरसेवक सूर्यकांत लवटे, सत्यभामा गाडेकर, दत्तात्रय सूर्यवंशी, ज्योती खोले, प्रशांत दिवे आदी उपस्थित होते. 

हेही वाचा > बहिणीच्या लग्नात भावाने दिले अनोखे 'गिफ्ट'; अख्ख्या पंचक्रोशीत होतेय चर्चा

...तर ४० कोटींची बचत 
कोरोना उच्चांकी पातळीवर होता, त्या वेळी सहा हजार रुपये चाचण्यांचा दर होता. नाशिकमध्ये आतापर्यंत ७४ हजार रुग्ण झाले. यंत्रे सुस्थितीत असती, तर नाशिककर नागरिकांचे ४० ते ४५ कोटींची बचत झाली असती. त्याचबरोबर व्हेंटिलेटर सुस्थितीत असते, तर रुग्ण दगावले नसते. व्हेंटिलेटरसाठी ऑक्सिजनची टाकी उभारण्यात प्रशासनाचे दुर्लक्ष झाले. ऑक्सिजन टाकी तयार करूनही पुरवठा नाही. खासगी रुग्णालयांच्या फायद्यासाठी यंत्रे सुरू नसल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.