वर्षातून एकदाच उघडणारे मंदिर तीन दिवस बंदच; कार्तिक स्वामीचे बाहेरूनच दर्शन

म्हसरूळ (नाशिक) : कार्तिक पौर्णिमेनिमित्त दर वर्षी तीन दिवस मोठ्या उत्साहात साजरा होणारा कार्तिक स्वामी महोत्सव यंदा कोरोनामुळे साध्या पद्धतीने साजरा झाला. मंदिर बंद असल्यामुळे भाविकांनी बाहेरूनच दर्शन घेतले. दर्शनासाठी मंदिराबाहेर भाविकांच्या रांगा होत्या.

मंदिराच्या बाहेरूनच कार्तिक स्वामींचे दर्शन

श्री काशी नट्टकोटी नगर छत्रमं मॅनेजिग सोसायटीतर्फे कार्तिक पौर्णिमेला साजऱ्या होणाऱ्या कार्तिक महोत्सवासाठी दोन दिवस आधीपासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी होती. कृतिका नक्षत्राच्या मुहूर्तावर मंदिरातील पूजा व आरती झाल्यानंतर कार्तिक स्वामींच्या दर्शनाला महत्त्व असल्यामुळे भाविकांची मोठी गर्दी होते. कार्तिक पौर्णिमेला वर्षातून एकदाच उघडणारे कार्तिक स्वामी मंदिर यंदा कोरोनामुळे तीन दिवस बंद आहे. दर वर्षी तीन दिवस भाविकांना मंदिरात दर्शन घेता येते. यंदा मात्र प्रवेश नसल्याने भाविकांनी मंदिराच्या बाहेरूनच कार्तिक स्वामींचे दर्शन घेतले.

भाविकांच्या हाती मोरपीस

मंदिरात जाता येत नसले तरी भाविक प्रवेशद्वाराच्या बाहेर थांबून मोरपीस, प्रसाद, चलनी नोट कार्तिक स्वामींच्या मूर्तीच्या चरणस्पर्शसाठी मंदिरातील सेवकांच्या हाती देताना दिसत होते. प्रत्येक भाविकाच्या हाती मोरपीस दिसत होता. मंदिराच्या बाहेरच्या बाजूला मोरपीस, प्रसाद, फुले आदींची अनेक दुकाने यंदा कमी असल्याचे दिसले.