‘वसंत’ देतोय निसर्ग बदलाचे संकेत! पाच दशकांत उष्णता वाढली चार ते पाच डिग्रीने 

वसंत देतोय निसर्ग बदलाचे संकेत 

फुलांचा बहर महिनाअगोदर; पाच दशकांत उष्णता चार ते पाच डिग्रीने वाढली 

नाशिक : अवकाळी पाऊस, गारपीट अशा निसर्गाच्या विचित्र खेळात वृक्षांच्या फुलांचा बहर महिनाअगोदर झाला आहे. हीच स्थिती पक्ष्यांच्या घरटे बांधण्यातून पाहावयास मिळते. वातावरणाच्या बदलाच्या परिणामामुळे जीवसुष्टीत बदल दिसू लागले आहेत. गेल्या पाच दशकांत उष्णता चार ते पाच डिग्रीने वाढली आहे. शहरीकरणाचे प्रमाण झपाट्याने वाढले असताना पेव्हर ब्लॉकमुळे जमिनीत पाणी झिरपण्याचे प्रमाण कमी झाले आहे. झाडांना फुटू लागलेली कोवळी लुसलुशीत पालवी जणू वसंत ऋतूच्या आगमनाची चाहुल देत असते. 

वसंत देतोय निसर्ग बदलाचे संकेत 
शहर आता विविध रंगांच्या फुलांनी सजू लागले आहे. पळस, पांगरा, स्पेतोडिया, गिरीपुष्प, पांढरी सवर, टॅब्युबिया, तामण, सीता-शोक, गुलाबी कॅशिया, बहावा, शिवन असे कितीतरी वृक्ष बहरले आहेत. पोपटच्या चोचीच्या आकारचा पळस पहिल्यांदा उन्हाळ्याची चाहूल देतो. त्याच्या पानाचा उपयोग पत्रावळीसाठी होतो. बुलबुल, वटवट्या, कोतवाल, रॉबिन, कावळे, साळुंख्या यांसारखे अनेक पक्ष्यांच्या आवडीचे झाड म्हणजे पांगरा. त्याच्या फुलांचा उपयोग विषबाधा झाल्यावर केला जातो. गेल्या दोन वर्षांपासून वृक्षांचा बहरण्याचा कालावधी दीड ते दोन महिने अगोदर होत आहे. नाशिकमधील वेदमंदिर परिसरातील नीलमोहर वृक्ष वर्षातून दोनदा बहरला आहे. पंडित कॉलनीमध्ये स्पेतोडिया, टिळकवाडीमधील सप्तपर्णी दोनदा बहरली आहे. मेमध्ये बहरणारा बहावा मार्चमध्ये बहरला आहे. पळस, पांगरा, काटेसवर, बहावा आदी वृक्ष त्यांच्या नैसर्गिक फुलोऱ्याच्या साधारण ३० ते ४५ दिवस अगोदर फुललेत. 

हेही वाचा -  नाशिकमध्ये आता कोरोनाचा युरोपियन स्ट्रेनचे संकट; काय आहे हा बी.१.१.७ स्ट्रेन? डॉक्टरांची माहिती

फुलांचा बहर महिनाअगोदर
यंदा पाऊस लांबल्याने जिल्ह्यातील अनेक तलाव, धरणे पाण्याने भरलेले आहेत. हरसूल घाटात काटेसावर हा वृक्ष डिसेंबरमध्ये पूर्ण बहरल्याचे चित्र बघावयास मिळत होते. घोटी-त्र्यंबकेश्‍वर रस्त्यावरील काटेसावर मार्चमध्ये बहरताना दिसत आहे. नाशिकमधील पाटील लेनमध्ये शिरीष बहरला आहे. वनस्पती, प्राणी आणि पक्षी निसर्ग बदलांचे अनेक संकेत देत आहेत. 

वृक्ष बहरण्याचा कालावधी 
- फेब्रुवारी ः पांढरी सावर, वारस, मोह, पळस, कडुलिंब, टॅब्युबिया 
- मार्च ः पांढरा खैर, पिवळा करमळ, पांगरा, शिरीष, नाग चाफा 
- एप्रिल ः आपटा, बेल, नीलमोहर 
- मे ः तामण, तिवर, बहावा, कदंब, गुलमोहर, सीता-अशोक 

हेही वाचा - सटाण्यात लहान मुले सातच्या आत घरात! रात्रीच्या विचित्र प्रकाराने दहशत; युवकांचा जागता पहारा

पक्ष्यांचे घरटे बनविण्याचा महिना 
- मुनिया ः जून ते ऑक्टोबर 
- सूर्यपक्षी ः मार्च ते मे 
- चष्मेवाला ः मार्च ते मे 
- सातभाई ः मार्च ते सप्टेंबर 
- शिंपी ः एप्रिल ते सप्टेंबर 
- भारीट ः एप्रिल ते ऑगस्ट 
- बुलबुल ः फेब्रुवारी ते मे 
- कोकिळा ः एप्रिल ते ऑगस्ट