वसतिगृहांबाबत आदिवासी विभागच अनभिज्ञ; विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम

नाशिक : राज्यात शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर आदिवासी विकास विभागांतर्गत राज्यात किती वसतीगृहे सुरू करण्यात आली आहेत, याबाबत आदिवासी आयुक्तालयात माहिती नसल्याची बाब समोर आली आहे.
राज्यात ४ जानेवारीपासून नववी ते बारावीचे वर्ग व महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत. शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी शाळेस येण्यात सुरवात झाली आहे. 

आयुक्तांच्या सूचनेला केराची टोपली

राज्यातील दुर्गम आदिवासी भागातून शहरात शिक्षण घेत असलेले विद्यार्थीदेखील आता शाळांमध्ये येऊ लागले आहेत. शहरात राहण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत शासकीय वसतिगृहे चालविली जातात. मात्र शाळा व महाविद्यालये सुरू झालेली असताना वसतिगृह सुरू झाल्याबद्दल माहिती नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे राहण्याच्या व्यवस्थेअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. 
नवीन वर्षात शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर आदिवासी आयुक्तालयामार्फेत प्रत्येक प्रकल्प कार्यालयात किती वसतिगृहे सुरू झाली आहेत, याबाबतची माहिती आयुक्तालयाकडून मागविण्यात आली. मात्र माहिती देण्याच्या सूचना देऊनही एकही प्रकल्प कार्यालयाकडून दहा दिवस उलटूनही माहिती देण्यात आलेली नाही. 

शैक्षणिक नुकसान

आयुक्तालयामार्फेत वेळावेळी माहिती मागूनही कार्यालयांकडून ती देण्यास टाळाटाळ होत आहे. त्यामुळे प्रकल्प कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून आयुक्तालयाच्या सूचनांची किती अंमलबजावणी होते, यावरून स्पष्ट होते. 
आदिवासी संघटनेचे निवेदन राज्यातील आदिवासी विकास विभागामार्फेत चालविले जाणारे राज्यातील सर्व शासकीय वसतिगृह तत्काळ सुरू करण्याची मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने केली आहे. याप्रकरणी आदिवासी आयुक्तांनाही निवेदन देण्यात आले. दुर्गम भागात राहत असलेले अनेक आदिवासी विद्यार्थी शिक्षणासाठी शहरात आहे. मात्र तालुका व शहरांमधील अनेक वसतिगृहे सुरू न झाल्याने या विद्यार्थ्यांची राहण्याची सोय नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. 

हेही वाचा > ऐनसंक्रांतीच्या सणाला घरावर ओढावली 'संक्रांत'; लेकाला उराशी धरुन मातेचा जीवघेणा आक्रोश

यामुळे राज्यातील सर्व शासकीय वसतिगृह सुरू करून त्यांची जेवणाची व्यवस्था करून निर्वाह भत्ता व इतर सुविधा तत्काळ पुरविण्यात याव्यात, अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेमार्फेत करण्यात आली. महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष लकी जाधव, सुनील खराटे (अमरावती), वीरेंद्रकुमार उईके (गोंदिया) आदी उपस्थित होते.

हेही वाचा > ढोंगीबाबाचा कारनामा! आधी खड्याचा केला रुद्राक्ष अन् नंतर केले असे काही; रवानगी थेट पोलिस ठाण्यातच