वसुबारस नव्हे तर वाघबारस’ने आदिवासींच्या दिवाळीला प्रारंभ

वाघबारसने दिवाळीला सुरुवात

कनाशी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; वसूबारसपासून आपण सर्व जण दिवाळी सणाला सुरुवात करतो. मात्र, आदिवासी भागात परंपरेनुसार काल मंगळवारी (दि. 7) वाघबारसने दिवाळी सणाला उत्साहात प्रारंभ झाला. आदिवासी बांधवांनी गावोगावी वाघाची पूजा करत सुख-शांतीसाठी निसर्गाला साकडे घातले.

हिंदू धर्मात अनेक सण पारंपरिक पद्धतीने साजरे केले जातात. विशेषत: हिंदू धर्मात दिवाळी सणाचे विशेष महत्त्व असून, वसूबारसने या सणाची सुरुवात होते. मात्र, या उलट आदिवासी समाजात वाघबारसने दिवाळीला प्रारंभ होतो. दिवाळीत नवीन कपड्यांची खरेदी, गोडधोड, लक्ष्मीपूजन म्हणजेच पैसा अडका, दागदागिने, सोने-नाणे यांची पूजा केली जाते. मात्र, आदिवासींमध्ये दिवाळी सण लक्ष्मीपूजन म्हणून गोमातेचे पूजन करतात. आदिवासीबहुल तालुक्यात कोकणा, महादेव कोळी, वारली, भिल्ल या जमातींचे आदिवासी दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. सध्या आदिवासीबहुल तालुक्यात वाघबारसने दिवाळीला प्रारंभ झाला असून, सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे.

कळवण तालुक्यात गंगापूर, जयपूर, आंबुर्डी, मोहबारी, गोळाखाल, धनेर, गणोरे, दरेभनगी, वंजारी या भागात मंगळवारी वाघबारसचा उत्साह दिसून आला. काही गावांमध्ये कौटुंबिकस्तरावर तर काही ठिकाणी आदिवासी बांधव एकत्र येऊन वाघदेवाच्या मंदिरात जाऊन पूजा करतात. वाघदेवाच्या मूर्तीवर चंद्र, सूर्य, वाघदेव, नागदेव, मोर यांची चित्रे कोरलेली असतात. शेतात पिकलेल्या नवीन धान्याची कणसे, नागली, बाजरी, झेंडूची फुले वाघदेवाला वाहिली जातात.

गुराख्यांसह गुरांचे रक्षण

आदिवासी त्यांची गुरे वर्षभर रानावनात, दऱ्याखोऱ्यात चारण्यासाठी जात असतात. अशावेळी त्यांचे वन्यप्राण्यांपासून रक्षण व्हावे, वन्यप्राण्यांचे भक्ष्य ठरू नये. तसेच गुरे व गुराख्यांना सुख-शांती लाभावी हा उद्देश या निसर्गपूजेमागे असतो.

– यशवंत गावित, संजय गावित, गंगापूर

 

हेही वाचा :

The post वसुबारस नव्हे तर वाघबारस'ने आदिवासींच्या दिवाळीला प्रारंभ appeared first on पुढारी.