वाइन ग्रेप पिकविणाऱ्या शेतकऱ्यांसमोर अडचणींचा डोंगर; लॉकडाउनचा फटका

सिन्नर (जि.नाशिक) : वाइन कॅपिटल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील वायनरी उद्योग कोरोना संकटामुळे अडचणीत सापडला आहे. गेल्या दहा महिन्यांपासून बार आणि रेस्टॉरंट बंद राहिल्याने कंपन्यांनी उत्पादित केलेली वाइन तशीच पडून राहिली असून, येत्या हंगामात वाइनसाठीची विशेष द्राक्ष पिकविणाऱ्या शेतकऱ्यांना द्राक्ष उत्पादन घटविण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे अगोदरच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर अडचणींचा मोठा डोंगर उभा राहण्याची भीती आहे. 

वाइन ग्रेप पिकविणाऱ्या शेतकऱ्यांसमोर अडचणींचा डोंगर
टेबल ग्रेप अर्थात खाण्यासाठी वापरात येणारी द्राक्षे उत्पादित करणाऱ्या शेतकऱ्यांना सातत्याने अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करावा लागत आहे. द्राक्षपंढरीत गेल्या वर्षी ही द्राक्षे अक्षरशः टाकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. त्यातच आता वायनरी उद्योग अडचणीत आल्याने वाइन ग्रेप पिकविणाऱ्या शेतकऱ्यांनादेखील हतबल होण्याची वेळ आली आहे. 
खात्रीचे उत्पन्न मिळते म्हणून सिन्नरच्या पूर्व भागासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी वाइननिर्मितीसाठी लागणारी द्राक्षे उत्पादित करण्यास सुरवात केली. त्यासाठी कंपन्यांसोबत रीतसर करारही केले आहेत. मात्र, एकूणच शेतीच्या व्यवसायात धोके अधिक असल्याने या कराराचादेखील फायदा होतो की नाही, अशी भीती शेतकऱ्यांना आहे.

लॉकडाउनचा फटका : कंपन्यांकडून ३० ते ४० टक्के कमी उत्पादन घेण्याच्या सूचना 

कोरोनामुळे गेल्या वर्षी उत्पादित केलेली वाइन कंपन्यांमध्ये पडून आहे. वाइन उत्पादकांना ६५ टक्के उत्पादन बार आणि रेस्टॉरंटमध्ये विकण्याची संधी असते. मात्र, गेल्या दहा महिन्यांपासून बार आणि रेस्टॉरंट बंदच असल्याने उत्पादित वाइनचे करायचे काय, असा प्रश्न कंपन्यांसमोर आहे. त्यात नव्याने द्राक्ष हंगाम सुरू होणार असल्याने अगोदरच अडचणीत आलेल्या कंपन्यांनी थेट शेतकऱ्यांना सावधगिरीच्या सूचना द्यायला सुरवात केली आहे. तुम्ही उत्पादित केलेल्या मालापैकी ६० ते ७० टक्के माल खरेदी करण्यात येईल. त्यापुढील नुकसानीची झळ तुम्ही सोसा, असे शेतकऱ्यांना सुचविण्यात येत आहे. सिन्नरच्या सांगवी, सोमठाणे परिसरात वाइनसाठी लागणारी द्राक्षे उत्पादित केली जातात. तालुक्यात तीनशे एकर क्षेत्र त्यासाठी लागवडीखाली आणण्यात आले आहे. आता कंपनीकडूनच शंभर टक्के उत्पादन घ्यायला नकार मिळणार असेल तर आतबट्ट्याचा व्यवहार आम्ही का करावा, असा प्रश्न या शेतकऱ्यांचा आहे. 

माल पडून राहण्याची भीती 
सुला, विंचुरा, रेवो, जम्पा, यॉर्क, रोहित अॅन्ड सन्स यांसारख्या मोठ्या कंपन्यांसह असंख्य वायनरी उद्योग या व्यवसायात आहेत. या कंपन्यांनी करार करून शेतकऱ्यांना वाइनसाठीची द्राक्षे उत्पादित करायला प्रोत्साहन दिले आहे. सिराज, कॅबरनेट, शेनीन, टेम्परनिलो, मेरलॉटसारख्या जातींची शेतकऱ्यांनी लागवड केली असून, ही द्राक्षे खाण्यासाठी वापरत नाहीत. ४५ ते ७० रुपये प्रतिकिलो खात्रीशीर दर गेल्या वर्षी शेतकऱ्यांना मिळाला होता. त्यामुळे थोडेफार नुकसान दुर्लक्षित करणे शक्य व्हायचे. पण आता पाच ते सात टन उत्पादित मालापैकी केवळ साडेतीन ते पाच टन माल कंपनी घेणार असेल तर उर्वरित मालाचे करायचे काय, हा प्रश्न आहे. 

कोरोनामुळे वाइन उद्योग आर्थिक संकटात सापडला आहे. दर वर्षी शेतकऱ्यांकडून निर्धारित किमतीत द्राक्षे खरेदी केली जातात. मात्र यंदा परिस्थिती प्रतिकूल आहे. गेल्या हंगामात सरकारने टेबल ग्रेप खरेदी करायला लावले. परिणामी विक्रमी उत्पादन झाले. मात्र ही सर्व वाइन टाक्यांमध्ये पडून आहे. आता नव्या हंगामात टाक्या उपलब्ध नसतील तर द्राक्ष खरेदी करून करायचे काय? कोरोनाचे संकट केवळ शेतकऱ्यांवर नाही तर वाइन उत्पादकांवरदेखील आहे. -जगदीश होळकर, अध्यक्ष, ऑल इंडिया वायनरी असोसिएशन