वाजदरे शिवारात केमिकलचा टँकर उलटला; गळती होऊन रसायन विहिरीसह बुराई नदीत

पिंपळनेर (जि. धुळे); पुढारी वृत्तसेवा : साक्री तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र.८ निजामपूर- नंदुरबार रस्त्यावर केमिकल वाहून नेणारा टँकर वाजदरे शिवारात उलटल्याची घटना घडली. यात कोणतीही जीवत हानी झाली नाही. मात्र, टॅंकरला गळती होवून केमिकल शेतातील विहिरीमध्ये तसेच नाल्यातून बुराई नदीमध्ये वाहून लागले.

साक्री तालुक्यातील निजामपूर- नंदुरबार रस्त्यावर असलेल्या बाजदरे शिवारात शरद सोनकर यांच्या शेताजवळ केमिकल वाहून नेणारा टॅंकरचा ( क्रमांक -जीने.एव्ही.६८०६) अपघात होवून पलटी झाला. यामुळे टॅंकरला गळती लागली आणि त्यातील केमिकल शरद सोनकर यांच्या विहिरीमध्ये तसेच शेजारी वाहत असलेल्या नाल्यामधून बुराई नदीकडे वाहून गेले.

याच दरम्यान गळती होणारे केमिकल दुसऱ्या टँकरमध्ये भरण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यात फारसे यश मिळाले नाही. केमिकल पाण्याद्वारे वाहून विहिरीत बुराई नदीमध्ये जात होते. विहिरीतील पाण्यामध्ये घातक केमिकल मिसळले गेल्याने शेतीचे व पिकांचे नुकसान होण्याची चिंता शेतकरी किसन सोनकर व शरद सोनकर यांनी व्यक्त केली. घातक केमिकल नाल्याच्या पाण्याद्वारे बुराई नदीमध्ये मिसळत असुन नदीकाठाच्या शेतांना धोका निर्माण झाला आहे.

वाजदरे गावातील ग्रामस्थ अपघातस्थळी मदतीसाठी धावून आले. सर्वतोपरी प्रयत्न करून टँकरच्या केमिकलपासून धोका निर्माण होऊ नये यासाठी सायंकाळी उशिरापर्यंत प्रयत्न करण्यात येत होते.

हेही वाचलंत का? 

The post वाजदरे शिवारात केमिकलचा टँकर उलटला; गळती होऊन रसायन विहिरीसह बुराई नदीत appeared first on पुढारी.