Site icon

वाटा विकासाच्या : काय डोंगर, काय झाडी, काय फळबाग…..शिरसाटे गावात कसं ओक्केमधी हाय सगळं

नाशिक : वैभव कातकाडे
मध्यंतरी राज्यातील एका आमदाराचा गाजलेला हा डायलॉग इगतपुरी तालुक्यातील शिरसाटे गावात गेल्यावर आठवल्याशिवाय राहात नाही. जिल्हा परिषदेने या गावाला नुकताच स्व. आर. आर. आबा सुंदर गाव पुरस्कार प्रदान केला. या गावाला मिळालेला हा पहिलाच पुरस्कार नाही, तर यापूर्वीही माझी वसुंधरा उपक्रमात या गावाने उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे राज्य शासनाने या गावाला गौरविलेले आहे. आताही येथे राष्ट्रसंघाने घोषित केलेली शाश्वत विकासाची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

मुंबई महामार्गापासून आठ किमी अंतरावरील या गावाची लोकसंख्या अवघी 1 हजार 280 इतकी असून, 255 कुटुंब येथे राहतात. पावसाळ्यात प्रचंड पाऊस, डोंगरावर वनराई तसेच वसुंधरेने हिरवा शालू पांघरला असल्याचे चित्र या ठिकाणी असते. मात्र, उन्हाळ्यात दगडी माळरान, प्रचंड ऊन आणि सगळीकडे कोरडाठाक परिसर असे विरोधाभासी वातावरण गावात आहे. मात्र, गेल्या तीन-चार वर्षांत या गावाने विकासाचा मुद्दा उचलून धरत विविध शासकीय योजनांचा आधार घेत त्यात नावीन्य शोधत काम केले आहे. ‘गाव करी, ते राव न करी’ या उक्तीप्रमाणे गावातील बरेच रावकरी फक्त नावालाच उरले होते. गावाने संकल्प केला आणि माझी वसुंधरा उपक्रमात सहभागी होत पंचमहाभुतांना अनुसरून कामाला लागले. पृथ्वी, जल, वायू, आग आणि आकाश या पंचतत्त्वांसाठी विविध उपक्रमांचे नियोजन सुरू झाले आणि काही दिवसांत उभे राहिले एक आदर्श गाव. या गावाला आतापर्यंत 800 ग्रामसेवक आणि सरपंचांनी भेट दिली आहे. गावात प्लास्टिकमुक्तीचा प्रकल्प राबविला जात आहे.

या गावात गायचराई माळरानावरील जागेवर या ग्रामपंचायतीने गावाच्या विकासासाठी अथक प्रयत्न केले आहेत. लोकसंख्येच्या निकषानुसार महाराष्ट्र रोजगार हमी योजनांतर्गत 8 हजार झाडांची फळबाग फुलविली आहे. यामध्ये 1 हजार 300 केशर आंबा, 1 हजार 700 सीताफळ, जांभूळ, साग अशा झाडांचा सहभाग आहे. ही फळबाग फुलविताना गावच्या सरपंचांपासून ग्रामसेवक, ग्रामसेवक सदस्य रोज स्वत: कामे करत फळबाग फुलवित होते. या फळबागेमुळे येत्या दोन वर्षांनंतर ग्रामपंचायतीला लाखोंचे उत्पन्न सुरू होणार आहे.                                                                                                                                                                                  (पूर्वार्ध)

* 8,000 झाडांची फळबाग फुलली
* 1,300 केशर आंबा लागवड
* 1,700 सीताफळ, जांभूळ, साग
* 5,000 उर्वरित झाडांची लागवड

हेही वाचा:

The post वाटा विकासाच्या : काय डोंगर, काय झाडी, काय फळबाग.....शिरसाटे गावात कसं ओक्केमधी हाय सगळं appeared first on पुढारी.

Exit mobile version