वाटा विकासाच्या : शेण आणि गोमूत्रापासून ४५ ते ४८ प्रकारच्या उत्पादनांची निर्मिती

शेण आणि गोमूत्र

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नागपूर जिल्ह्याच्या उत्तरेला आणि मध्य प्रदेशच्या सीमेलगतच्या रामटेक तालुक्यातील देवलापार येथील गोविज्ञान संशोधन केंद्राद्वारे शेण आणि गोमूत्रापासून साधारणपणे ४५ ते ४८ प्रकारची उत्पादने तयार केली जातात. त्यांच्यापासून वर्षाकाठी कोटी रुपयांची उलाढाल या ठिकाणी होत आहे. तसेच वर्षभरात हजारो लोक याठिकाणी भेट देण्यासाठी तसेच या संस्थेत प्रशिक्षणासाठी येत असतात.

नागपूर जिल्ह्यात रामटेक तालुक्यात देवलापार येथे गोविज्ञान संशोधन केंद्र कार्यरत आहे. संस्थेची देवलापार येथे ६६ एकर, तर तेथून जवळ निमटोला ग्रामपंचायत हद्दीत उर्वरित अशी एकूण ८० एकर जागा आहे. संस्थेकडे प्रशिक्षण व निवासी शाळेचीही सुविधा आहे. वर्षभरात 10 हजारांहून अधिक व्यक्ती संस्थेला भेट देतात. बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, उत्तराखंड आदी विविध राज्यांतील शेतकऱ्यांना शासकीय वा अन्य यंत्रणांकडून येथे प्रशिक्षणासाठी पाठविले जाते.

भारतीय देशी गोवंशाची उपयोगिता वाढविणे, त्यासाठी गोवंश संगोपन, सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देत त्या माध्यमातून शेतीतील उत्पादन खर्च कमी करणे, या माध्यमातून शेतकरी आत्महत्या नियंत्रणात आणणे यांसारखी विविध उद्दिष्टे ठेवली आहेत. येथे तीन बायोगॅस प्रकल्प कार्यान्वित आहेत. गोमूत्र अर्क तयार करण्यासाठी विशेष यंत्र प्रणाली तयार केली आहे. याठिकाणी सांडपाण्यावर प्रक्रिया करून सांडपाण्याचा पुनर्वापर करण्यात येत आहे. यासाठी नागपूर येथील निरी संस्थेच्या सहकार्याने येथे उर्ध्व-प्रवाह सघन कन्स्ट्रक्टेड वेटलॅन्ड आधारित (UCCW) एसटीपी कार्यान्वित केला आहे. संस्थेच्या आवारात गांडूळ खतनिर्मितीही होत असून, त्याची विक्री शेतकऱ्यांना होते. दुधाबरोबरच शेण व गोमूत्रही अत्यंत महत्त्वाचे असून, त्यांचा वापर शेती व मानवी कारणांसाठीही होतो. त्यादृष्टीने विविध उत्पादने संस्थेने तयार केली आहेत. संस्थेने विविध उत्पादनांच्या निर्मितीसाठी येथे प्रयोगशाळाही उभारली आहे.

तंत्रज्ञानाला मिळाली पेटंट्स
संस्थेने देशपातळीवरील संस्थांच्या संशोधन व तंत्रज्ञान या अनुषंगाने आपल्या उत्पादनांना स्पेस मिळविली आहे. यात गोमूत्र अर्काचा ‘बायोइनहंसर’ म्हणून वापर करण्यासाठी पेटंट मिळाले आहे. सुमारे पाच देशांत हे पेटंट्स नोंदविण्यात आली आहेत. गोमूत्र, शेण तसेच अन्य घटकांचा वापर करून तयार केलेल्या कीड नियंत्रकाचे पेटंट संस्थेने मिळविले आहे. त्याचा वापर शेती संरक्षक म्हणून होऊ शकतो. संस्थेच्या सुमारे ३० पेटंटची नोंदणी झाली आहे.

सुमारे १५० जणांना रोजगार

नागपूर, देवलापार आणि चंद्रपूर जिल्ह्यांतील राजुरा येथेही संस्थेचे कार्य चालते. राजुरा येथे गोशाळा आणि वसतिगृह आहे. सर्व ठिकाणी मिळून संस्थेने सुमारे १५० पेक्षा अधिक जणांना रोजगार दिला आहे. उत्पादनांच्या विक्रीतून आर्थिक गरजा भागविल्या जातात. सेवाभावी व्यक्तीकडून संस्थेला देणगी मिळते. त्यातून विकास आणि विस्तारकामे होतात.

हेही वाचा : 

The post वाटा विकासाच्या : शेण आणि गोमूत्रापासून ४५ ते ४८ प्रकारच्या उत्पादनांची निर्मिती appeared first on पुढारी.