वाढत्या कोरोनात प्राणवायूचे संकट! देयके अदा न केल्याने पुरवठा बंद करण्याचे संकेत 

नाशिक : गेल्या वर्षी मे ते सप्टेंबर या पाच महिन्यांच्या कालावधीत शहरासह जिल्ह्यात कोरोनाने उच्चतम पातळी गाठल्यानंतर रुग्णांना प्राणवायूचा (ऑक्सिजन) पुरवठा करण्यासाठी सरसावलेल्या कंपन्यांना कपाळावर हात मारून घेण्याची वेळ आली आहे.

संकट कालावधी संपुष्टात आल्यानंतर कुठल्याही कारणाशिवाय जिल्हा रुग्णालयाने तब्बल पाऊण कोटींचे बिल अडकवून ठेवल्याने ऑक्सिजन पुरवठा बंद करण्याच्या मानसिकतेत कंपन्या आल्या असून, सध्याच्या वाढत्या कोरोना रुग्णांना ऑक्सिजन तुटवडा जाणवल्यास मोठे संकट ओढावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

दोन महिन्यांपासून चालढकल

गेल्या वर्षी मार्चमध्ये लासलगावला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला, तर एप्रिलमध्ये नाशिक शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण गोविंदनगर भागात आढळला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. मे ते सप्टेंबरदरम्यान कोरोनाने उच्चतम पातळी गाठली. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, शहर व ग्रामीण भागात कोविड सेंटर उभारण्यात आले. कोविड सेंटरमध्ये रुग्णसंख्या वाढल्याने खासगी रुग्णालयांमध्ये कोविड बेड आरक्षित करण्यात आले. याचदरम्यान जिल्हा रुग्णालय, महापालिका रुग्णालय तसेच खासगी रुग्णालयांत हायरिस्क रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडल्याने शासकीय यंत्रणेची धावपळ उडाली. ऑक्सिजन पुरवठादार कंपन्यांना सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली. आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता, कारखान्यांचा ऑक्सिजन पुरवठा बंद करून रुग्णालयांना पुरवठा करण्यात आला. ऑक्सिजन कंपन्यांनी वेळेवर सहकार्य केल्यानंतर शासकीय रुग्णालयांची बिले तत्काळ काढून देण्याची जबाबदारी असताना, आता देयके काढण्यासाठी दोन महिन्यांपासून चालढकल केली जात आहे. जिल्हा रुग्णालयाने तब्बल पाऊण कोटींचे बिल थकविले आहे. तगादा लावूनही आज, उद्यावर दिवस ढकलला जात असल्याने ऑक्सिजन पुरवठा बंद करण्याच्या मानसिकतेत पुरवठादार आले आहेत. महापालिका, ग्रामीण रुग्णालयांचे देयके वेळेवर अदा केले जात असताना, जिल्हा रुग्णालयाकडूनच होणारी अडवणूक चिरीमिरीसाठी तर नाही ना, असा संशय व्यक्त केला जात आहे. 

हेही वाचा - सिव्हील हॉस्पीटलमधून बालिका अपहरण प्रकरणी अपहरणकर्त्याकडून खुलासा! वेगळेच सत्य समोर

दोन महिन्यांपासून देयके मिळविण्यासाठी अन्य कामे सोडून चकरा माराव्या लागत आहेत. संकटाच्या काळात प्रतिदिन ५०० पेक्षा जास्त सिलिंडर पुरविण्यात आले. मात्र, दगडाखालचे हात निघाल्याने जिल्हा रुग्णालयाकडून चालढकल केली जात आहे. आता ऑक्सिजन पुरवठा बंद करण्याची मानसिकता आहे. 
-अमोल जाधव, ऑक्सिजन पुरवठादार 
 
देयके अदा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे नस्ती सादर केली आहे. लवकरच देयके अदा करू. रुग्णांना ऑक्सिजन कमी पडू देणार नाही. 
-रत्ना रावखंडे, जिल्हा शल्यचिकित्सक  

हेही वाचा - अख्खे गाव हळहळले! दोन सख्ख्या बहिणींच्या एकत्रच निघाल्या अंत्ययात्रा; पाच मुलांमधून आता तिघांचाच आधार