वाढत्या नागरीकरणाच्या पसाऱ्यात हरवली गाववेस! ऐतिहासिक ठेवा जतन करण्याची गरज 

नांदगाव (जि.नाशिक) : शाकंबरी आणि लेंडी नदीकाठावर तटबंदीच्या आत सुरक्षितपणे वसलेले गाव म्हणजे ‘नांदगाव’. या गावाचा गावगाडा हाकणारी पालिका फेब्रुवारीच्या महिन्यात शंभरी गाठणार आहे. वाढत्या नागरीकरणाच्या रेट्यात गावगाड्याच्या जुन्या खुणा हळूहळू आता नजरेआड होऊ लागल्याच्या पार्श्वभूमीवर गावातील ऐतिहासिक दस्तऐवज असलेल्या आड, बुरूज व गाववेस यांचे जतन करण्याच्या मागणीला जोर येत आहे. 

वाढत्या नागरीकरणाच्या पसाऱ्यात हरवली गाववेस 
साधारणपणे नांदगाव वसले नेमके कधी, याबाबद्दलची मतभिन्नता आहे. लोहशिंगवे डोंगरातून उगम पावलेल्या शाकंबरी नदीचे विस्तीर्ण पात्र आता कोरडे राहत असल्याने नांदगावच्या या नदीला आता मरणकळा आल्या आहेत. खरे म्हणजे गावात दोन नद्या आहेत. एक आहे लेंडी व दुसरी आहे ती शाकंबरी. या दोन नद्यांच्या मध्यभागी नदीपात्रालगतच्या तटबंदीत नांदगाव वसले. घोड्यावर बसून बाजारहाटाची रपेट करावी लागत असल्याचे दाखले दिले जातात, असा ऐतिहासिक संदर्भ असलेल्या नांदगावमध्ये पूर्वीच्या काळात असलेले वाडे, त्यातील जुन्या धाटणीचे खोलवरचे आड आज नामशेष होत आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळातील चळवळींचे नांदगाव स्फूर्तिस्थान राहिल्याचाही संदर्भ आहे. दाभाडी प्रबंधाच्या संकल्पनेचेही उगमस्थान नांदगावच्या तत्कालीन राजकीय सामाजिक चळवळीत दडलेले आहे. 

हेही वाचा>> जेव्हा अजगर गिळायला लागतो संपूर्ण बोकडाला! तब्बल पाच-सहा तास प्रयत्न; पाहा VIDEO

 ऐतिहासिक ठेवा जतन करण्याची गरज 

सध्या नांदगावच्या गाववेशी दोन ठिकाणी आहेत. पहिली वेस शनी मंदिराजवळ, तर दुसरी शाकंबरीच्याच पात्राला खेटून आहे. या वेशीला अजूनही भक्कम स्थितीतील लाकडी दरवाजे आहेत व या वेशीला घडीव दगडाची कमान व मातीचे ढासळलेले बुरूज तिच्या मजबुतीची साक्ष देतात. 
नदीपात्राला येणारे पुराचे पाणी आता नवलाईची बाब बनली असली तरी या लहानशा शहरात इतिहासाचे अनेक संदर्भ आहेत. गावातील या वेशी ओलांडून पुराच्या पाण्याने गावात कधीही प्रवेश केला नसल्याचे जुने जाणकार सांगतात. शहराचे प्रवेशद्वार असलेल्या वेशी व त्यांची अवस्था मात्र सद्यःस्थितीत काळजी करण्यासारख्या अवस्थेत आहे. पालिका प्रशासनाने शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर ऐतिहासिक ठेवा जतन करण्यासाठी नियोजन करायला हवे अशीही मागणी होत आहे. 

 हेही वाचा>> शिवला डॉक्टर नाही तर इंजिनिअर करीनच!" फुटपाथावर जगत असलेल्या जिद्दी दाम्पत्याचं स्वप्न