वातावरणातील बदलांमुळे बळावला व्‍हायरल आजांराचा धोका; काळजी घेण्याचा तज्‍ज्ञांचा सल्‍ला

नाशिक : हिवाळ्यामुळे गारवा वाढलेला असताना ढगाळ वातावरणातील पावसामुळे आरोग्‍याचा गंभीर प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. अशा वातावरणामुळे व्‍हायरल आजारांचा धोका वाढला असून, नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचा सल्‍ला वैद्यकीय तज्‍ज्ञांनी दिला आहे. डेंगीच्या रुग्‍णांतही वाढ हात असल्‍याने घर व सभोवतालच्‍या परिसरात नियमितपणे स्‍वच्‍छतेचे आवाहन केले आहे. 

दोन दिवसांपासून शहरासह जिल्‍हाभरात ढगाळ वातावरण असल्‍याने सूर्याचे दर्शन दुर्लभ झाले आहे. अशात ढगाळ वातावरण व त्‍यातच पडणाऱ्या पावसामुळे आरोग्‍याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. आधीच वातावरणात निर्माण झालेल्‍या गारव्‍यामुळे सर्दी-पडशाचे रुग्‍ण आढळण्याचे प्रमाण वाढले होते. त्‍यातच सध्याच्‍या वातावरणात हा धोका आणखी वाढला असल्‍याचे जाणकारांचे म्‍हणणे आहे. आगामी दोन-तीन दिवस असेच वातावरण राहिल्‍यास रुग्‍णांमध्ये झपाट्याने वाढ होईल. परिणामी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचाही धोका निर्माण आहे. तसेच डेंगीची साथ सध्या सुरू असल्‍याने या रुग्‍णांमध्येही लक्षणीय वाढ होण्याची भीती व्‍यक्‍त होत आहे. अशा काळात आरोग्‍याची काळजी घेणे अधिक महत्त्वाचे आहे. 

हेही वाचा - दुर्दैवी! एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद; दुसरीकडे क्षणार्धात भावाची निघाली अंत्ययात्रा

अशी घ्या आरोग्‍याची काळजी... 

- पाणी स्‍वच्‍छ व शक्‍यतो उकळून प्‍यावे. 
- शिळे अन्न खाण्याचे टाळावे, ताजे अन्न खावे. 
- सुकामेव्‍याचा आहारात समावेश करावा. 
- गारव्‍यामुळे उष्ण कपडे परिधान करावेत. 
- पावसात भिजण्याचे टाळावे. 
- सर्दी-पडसे जाणवल्‍यास डॉक्‍टरांचा सल्‍ला घ्यावा. 
- ज्‍येष्ठ नागरिक, लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी. 
- श्र्वसनाचा आजार असलेल्‍या रुग्‍णांनी बाहेर पडण्याचे टाळावे. 
- घरी असताना गरम कपडे व अन्‍य आवश्‍यक बाबींचा आधार घ्यावा. 

हेही वाचा - धक्कादायक! तपोवन परिसरात आढळला युवतीचा विवस्त्र मृतदेह; परिसरात खळबळ

वातावरणातील बदलांमुळे व्‍हायरल आजारांचे प्रमाण वाढू शकते. ऑडिनो, रायनोसारख्या व्‍हायरसमुळे साथीचे आजार बळावू शकतात. त्‍यामुळे अशा काळात विशेष काळजी घेणे महत्त्वाचे आहे. विशेषतः लहान मुले व ज्‍येष्ठांनी काळजी घ्यावी. कामाशिवाय घराबाहेर पडू नये, मास्‍क व सॅनिटायझरचा योग्‍य वापर करावा. 
-डॉ. हेमराज धोंडगे