वाळू माफीयांचा पोलीस पाटील व तंटामुक्त अध्यक्षावर हल्ला; दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

सटाणा (जि.नाशिक) : केरसाणे (ता.बागलाण) येथील कान्हेरी नदीपात्रात काल शनिवार (ता.२०) रोजी सकाळी दहा वाजता सुरू असलेली अवैध वाळू चोरी रोखण्यासाठी पुढे आलेल्या पोलीस पाटील भाऊसाहेब मोरे व तंटामुक्त अध्यक्ष संजय अहिरे यांना वाळू माफीयांकडून शिवीगाळ व बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी तत्काळ कारवाई केल्याने सटाणा पोलिस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या पत्रानुसार पोलीस पाटलांनाही आता संरक्षण देण्यात आले आहे. या पत्राआधारे पोलीस पाटील मोरे यांच्या तक्रारीवरून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी नोंदविण्यात आलेला राज्यातील हा पहिलाच गुन्हा ठरला आहे. 

वाळू माफीयांचा पोलीस पाटील व तंटामुक्त अध्यक्षावर हल्ला
पोलीस पाटील मोरे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, केरसाणे (ता.बागलाण) येथील कान्हेरी नदीपात्रातून दररोज अनधिकृतपणे वाळु उपसा सुरू असतो. काल शनिवार (ता.२०) रोजी सकाळी दहा वाजता रोशन इंदरसिंग थोरात व इंदरसिंग महादु थोरात (दोन्ही रा. केरसाणे ता.बागलाण) हे नदीपात्रातून वाळू उपसा करीत असताना पोलीस पाटील भाऊसाहेब मोरे, तंटामुक्त अध्यक्ष संजय अहिरे, उपसरपंचचे पती बाळु मोरे,  ग्रामपंचायत सदस्य संजय मोरे, साहेबराव मोरे, काशिनाथ अहिरे हे नदीपात्रात आले. यावेळी पोलीस पाटील मोरे व तंटामुक्त अध्यक्ष अहिरे यांनी रोशन थोरात व इंदरसिंग थोरात यांना वाळू उपसा करणे गुन्हा असून त्यामुळे गावाची पाण्याची पातळी खालावते, वाळू उपसा हा गुन्हा असल्याने असे करू नका, असे सांगून त्यांना प्रतिबंध केला असता रोशन थोरात याने जवळ पडलेल्या दगडाने तंटामुक्त अध्यक्ष संजय अहिरे यांना छातीला मोठा दगड मारुन मारहाण करण्यास सुरुवात केली.

सटाणा पोलीस ठाण्यात राज्यातील पहिलाच गुन्हा दाखल

पोलीस पाटील मोरे हे त्यांना सोडविण्यास गेले असता रोशनने त्यांनाही अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून धक्काबुक्की केली आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. रोशनने मोरे यांच्या गुडघ्याला दगड मारून मोठी दुखापत केली. तर इंदरसिंग थोरात याने थापड बुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले आणि मोरे व अहिरे यांना दमदाटी करून जीवे ठार मारण्याची धमकीही दिली. याप्रकरणी पोलीस पाटील भाऊसाहेब मोरे यांनी सटाणा पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, मारहाण करणे तसेच वाळू चोरीचा गुन्हा सटाणा पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल गवई हे पुढील तपास करीत आहेत. 

तत्काळ कारवाई केल्याने गुन्हा दाखल
दरम्यान, बागलाण तालुका पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष किशोर सूर्यवंशी यांनी या कारवाईचे स्वागत केले असून, पोलीस महासंचालकांच्या पत्रानुसार पोलीस पाटलांना आता संरक्षण प्राप्त झाले आहे. पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी तत्काळ कारवाई केल्याने गुन्हा दाखल झाला असून आता कायदा, सुव्यवस्था सांभाळण्यात पोलीस पाटीलांची प्रशासनाला महत्त्वाची मदत मिळेल, असेही सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले. 

 

पोलीस पाटील हा प्रशासनाचा गावपातळीवरील महत्वाचा घटक असून शासनाने गावातील कायदा व सुव्यवस्था राखण्याची महत्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे. प्रामाणिकपणे कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावर समाजकंटकांनी केलेले हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत. हल्लेखोरांवर कठोर कारवाई केली जाईल.- नंदकुमार गायकवाड, पोलीस निरीक्षक, सटाणा पोलीस ठाणे