वाहतूक कोंडीने निमाणी बसस्थानकाचा श्वास कोंडला; अतिक्रमणामुळे गर्दीत भर 

पंचवटी (नाशिक) : गणेश बोडके
अरुंद रस्ता त्यात हातगाड्या व टपऱ्यांचे अतिक्रमण, रिक्षा व टॅक्सीचालकांची मनमानी आणि सातत्याने वाढलेली वाहनांची संख्या यांच्यामुळे जुना आडगाव नाका ते निमाणी या मार्गावरील वाहतूक कोंडी समस्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे.

निमाणी येथे असलेले मंगल कार्यालय, राज्य परिवहन महामंडळाचे व मनपाच्या सिटीलिंक बससेवेचे स्थानक, शाळा व महाविद्यालये, दवाखाने व हॉस्पिटल तसेच काही अंतरावर असलेली बाजार समितीमध्ये येणाऱ्या कृषी मालाच्या गाड्यांची ये-जा यामुळे येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. येथे वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून चार-पाच वाहतूक पोलिसांचीदेखील नेमणूक केलेली असते. मात्र, येथे येऊन मिळणाऱ्या चारही रस्त्यांपैकी पोलिसांचे लक्ष मात्र लक्ष्मी दर्शनाकडे लागलेले असल्याने ते एकच ठिकाणी उभे असतात. त्यामुळे येथील रस्त्याचा श्वास कायम कोंडलेला असतो.

शाळांमुळे कोंडीत भर

सेवा कुंज येथे विविध शैक्षणिक संस्था असून, येथील शाळा व महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिकत आहेत. जुना आडगाव नाक्याकडून निमाणीकडे जाताना सेवाकुंज या ठिकाणी या विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडताना वाहने थांबवावे लागत असल्याने या कोंडीत आणखी भर पडते. यामुळे या ठिकाणी वाहनांच्या लांबवर रांगा लागत असल्याने पुढे जाण्यासाठी वाहने प्रतीक्षेत थांबलेली असतात. ही कोंडी वाढत थेट निमाणी ते जुना आडगाव नाक्यापर्यंत जाते. तसेच रस्त्यांच्या कडेलादेखील मोठ्या प्रमाणात वाहने पार्क केली जातात. यामुळे आधीच अरुंद असणारा हा रस्ता आणखी अरुंद होतो.

भाजीपाल्या गाड्यांची वाहतूक

जुना आडगाव नाक्याकडून निमाणी, पंचवटी कारंजा, बाजार समिती, दिंडोरी नाका, पेठ रोड, मखमलाबाद रोड आदींकडे जाणारी वाहने याच निमाणी मार्गाने येत असतात. हा मार्ग अत्यंत अरुंद असून सिटीलिंक बस, शेतमालाची वाहने तसेच शेतमाल खरेदी करून मुंबईला घेऊन जाणारी वाहने, शालेय वाहने, खासगी वाहने, रिक्षा, टॅक्सी, दुचाकींची वर्दळ असते. परिणामी, या गर्दीत अनेकदा छोटे-मोठे अपघात घडत असतात.

हंडी भरणाऱ्यांनी कोंडी सोडवावी

निमाणी आणि दिंडोरी नाका येथे नियमित वाहतूक पोलिसांची नियुक्त असतानाही हे नेमकं काय करतात हा प्रश्न कायम येथील वाहनचालकांना पडतो. दिंडोरी नाक्याच्या एका कोपऱ्यात आपली ड्यूटी बजावताना ते हमखास दिसतात. इतक्या मोठ्या वाहतूक कोंडीची हंडी भरत असताना वाहतूक पोलिसांनी अशा वेळी तरी वाहतुकीची कोंडी सोडवावी, ही वाहनचालकांची अपेक्षा आहे.

पंचवटीकरांची उपेक्षा

वाहतूक कोंडीमुळे येथे उड्डाणपूल प्रस्तावित करण्यात आला. मात्र, अनेक वर्षे तो धूळ खात पडलेला आहे. कुंभमेळ्याच्या निमित्ताने प्रत्येक वेळी हजारो कोटींची उड्डाणे घेणारी महापालिका याकडे कायमच दुर्लक्ष करत आहे. पंचवटीकरांची उपेक्षा होत आलेली आहे. कुंभमेळ्यानिमित्ताने उड्डाणपूल व्हावा ही पंचवटीकरांची अपेक्षा आहे.

हेही वाचा: