वाहनांची बेशिस्त पार्किंगमुळे नाशिक शहरातील पुलांचा जीव गुदमरला

पूलावरील पार्कींग www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहर वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे शहरातील प्रमुख पुलांवर बेशिस्तपणे पार्किंग करण्यात येत आहे. या वाहनांमुळे पुलांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. तसेच वाहतुकीसही खोळंबा निर्माण होत असल्याने नाशिककरांमध्ये रोष आहे.

जुने नाशिक व पंचवटीला जोडणार्‍या अहिल्यादेवी होळकर (व्हिक्टोरिया) पुलावर दोन्ही बाजूंनी दररोज बेशिस्तपणे वाहने उभी केली जात आहे. रविवार कारंजाकडून मालेगाव स्टॅण्डकडे जाताना पुलावर सायंकाळनंतर चारचाकी वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या असतात. त्यातही पुलावरील गर्दीत शहर वाहतूक सेवेची एखादी बस अडकल्यास तिच्या पाठीमागे अन्य वाहनांच्या रांगा लागतात. परिणामी या कोंडीतून मार्गक्रमण करताना नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. शहरातील दुसर्‍या क्रमांकाचा पूल असलेल्या संत गाडगे महाराज पुलाचीही अवस्था दयनीय आहे. या पुलावरही सर्रासपणे अनधिकृत पार्किंग तयार झाले आहे. बुधवारी बाजाराच्या दिवशी हमखास पुलावर दोन्ही बाजूंनी चालक वाहने उभी करून खरेदीसाठी निघून जातात. त्यामुळे पुलावरून मार्ग काढताना अन्य चालकांची दमछाक होत आहे. दरम्यान, शहरातील अन्य छोट्या-मोठ्या पुलांची अवस्था काहीशी अशीच पाहायला मिळते आहे. एरवी छोट्या-छोट्या कारणांवरून वाहनचालकांना दंड ठोठवणार्‍या शहर वाहतूक पोलिस विभागाने पुलांवरील या अनधिकृत पार्किंगकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना असून, ही समस्या तातडीने निकाली काढाव अशी मागणी समाजातील सर्वच स्तरातून होत आहे.

रिक्षाचालकांची दादागिरी
रविवार कारंजाकडून मालेगाव स्टॅण्डकडे जाणार्‍या पुलावर सुंदरनारायण मंदिरासमोर रिक्षाचालक रस्त्यात रिक्षा उभ्या करून प्रवासी भरतात. तर पुलावर भाजी व फळविक्रेते जागा अडवितात. येथून मार्गक्रमण करणार्‍या एखाद्या वाहनचालकाने रस्त्यातून रिक्षा बाजूला घेण्यास सांगितले असता रिक्षाचालक त्यांच्यावर दादागिरी करतात. प्रसंगी मारहाण करण्यापर्यंतदेखील या रिक्षाचालकांची मुजोरी वाढली आहे.

रामसेतूवर विक्रेत्यांचे ठाण
सराफ बाजार व पंचवटीला जोडणार्‍या रामसेतू पुलावर अनधिकृत विक्रेत्यांनी ठाण मांडले आहे. त्यामुळे पुलावरून जाणार्‍या पादचार्‍यांना अडथळ्यांची शर्यत पार करून जावे लागते आहे. दोन महिन्यांपूर्वी महापालिकेने या पुलावरील विक्रेत्यांना हटविले होते. त्यानंतर काहीकाळापुरते या विक्रेत्यांनी त्यांचे ठिकाण बदलत पुन्हा एकदा या पुलावर दुकाने थाटली आहे. महापालिकेने येथील अतिक्रमणावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी केली जात आहे.

हेही वाचा:

The post वाहनांची बेशिस्त पार्किंगमुळे नाशिक शहरातील पुलांचा जीव गुदमरला appeared first on पुढारी.