विकासकामांच्या माध्यमातून भाजपने वाढविला प्रचाराचा नारळ; महाजन, रावल यांच्या उपस्थितीत उद्‌घाटन 

नाशिक : पुढील वर्षाच्या प्रारंभीच होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर भाजपने शनिवारी (ता. ६) विविध विकासकामांच्या माध्यमातून प्रचाराचा नारळ वाढविला आहे. माजी मंत्री गिरीश महाजन, जयकुमार रावल यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. आगामी महापालिका निवडणूक भाजप विकासाच्या मुद्द्यावर लढणार असल्याचे सांगताना महाजन यांनी मागच्या पेक्षा अधिक जागा निवडून येतील, असा दावा केला. 

शहरातील सहा विभागांमध्ये रस्ते खडीकरण, डांबरीकरण व काँक्रिटीकरण कामाचे उद्‌घाटन झाले. पहिल्या टप्प्यात शंभर कोटी, दुसऱ्या टप्पात २०० कोटी, तर तिसऱ्या टप्प्यात २५० कोटी रुपये, असे एकूण ५५० कोटी रुपयांच्या रस्त्यांची कामे झाल्याचा दावा करण्यात आला. शहरात ९० हजार स्मार्ट एलईडी दिवे बसविण्याचे काम ९० टक्के पूर्ण झाले असून, झालेल्या कामांचे लोकार्पण करण्यात आले. नवीन वीस हजार विद्युत पोल, १२० किलोमीटरच्या मलवाहिका, पंचवटी विभागात नाट्यगृहाची निर्मिती, दिव्यांगांसाठी उपचार व प्रशिक्षण केंद्राच्या कामाचे उद्‌घाटन करण्यात आले. 
१७ जलकुंभांचे उद्‌घाटन  महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. 

VIDEO : "मास्क काढ तो" राज ठाकरेंचा माजी महापौरांना इशारा; विनामास्क नाशिकमध्ये दाखल

इंदिरानगरला रथचक्र चौकात कार्यक्रम 

इंदिरानगर : पूर्व प्रभागअंतर्गत येणाऱ्या विविध रस्त्यांच्या ३१ कोटींच्या विविध रस्त्यांच्या कामांचा प्रारंभ इंदिरानगरमध्ये गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आला. प्रभाग २३, ३० आणि ३१ साठीचा एकत्रित कार्यक्रम रथचक्र चौकात झाला. प्रभाग ३० च्या नगरसेविका सुप्रिया खोडे यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरला. गतवेळी गेलेल्या दोन जागांसह संपूर्ण १२ जागा निवडून देऊ, असा शब्द उपस्थित नगरसेवकांच्या वतीने सभागृहनेते सतीश सोनवणे यांनी माजी पालकमंत्र्यांना दिला. या वेळी आमदार प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, महापौर सतीश कुलकर्णी, उपमहापौर भिकूबाई बागूल, शहराध्यक्ष गिरीश पालवे, माजी आमदार बाळासाहेब सानप, विजय साने, स्थानिक नगरसेवक चंद्रकांत खोडे, शाहीन मिर्झा, रूपाली निकुळे, ॲड. श्‍याम बडोदे, डॉ. दीपाली कुलकर्णी, भगवान दोंदे, पुष्पा आव्हाड, ॲड. अजिंक्य साने, माजी नगरसेवक यशवंत निकुळे, संजय नवले, एकनाथ नवले, राम बडगुजर, ॲड. भानुदास शौचे, वैभव कुलकर्णी, संध्या कुलकर्णी, सचिन कुलकर्णी, साहेबराव आव्हाड आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. नगरसेविका सुप्रिया खोडे आणि त्यांचे पती माजी नगरसेवक सुनील खोडे यांची अनुपस्थिती चर्चेत होती. याबाबत खोडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, होऊ शकला नाही. 

नाशिक रोड : नाशिक रोड विविध प्रभागांतील रस्ते खडीकरण व डांबरीकरण कामांचा प्रारंभ झाला. आमदार राहुल ढिकले, गटनेते जगदीश पाटील, शहर सरचिटणीस जगन पाटील, नाशिक रोड मंडल अध्यक्ष हेमंत गायकवाड, नगरसेवक संभाजी मोरुस्कर, अंबादास पगारे, शिक्षण मडळ सभापती संगीता गायकवाड, नगरसेविका मीराबाई हांडगे, कोमल मेहेरोलिया, दिनकर आढाव, शरद मोरे, बाजीराव भागवत, क्रांता वराडे, प्रदेश कार्यकारिणी सदस्या माधुरी पालवे, महानगर चिटणीस सुजता जोशी, नवनाथ ढगे, सुनील आडके, मंगेश पगार, सचिन हांडगे, विनोद खरोटे, किरण पगारे, नितीन कुलकर्णी आदी उपस्थित होते. संयोजन युवा मोर्चा अध्यक्ष संदीप शिरोळे, शांताराम घंटे, बापू सातपुते, विनोद नाझरे, सतीश रत्नपारखी, जयंत नारद, धुपेश अहिरराव, अशोक गवळी, विनोद आव्हाड, ज्ञानेश्वर चिडे, रेखा निकम, भूषण चव्हाण, हेमंत नारद, अनिता राणा, राजनंदिनी आहिरे, कांचन चव्हाण, नितीन कुलकर्णी, संदीप निकम, निवृत्ती अरिंगळे, सुशील अष्टेकर, निर्मल भंडारी, राम डोबे, गौरव विसपुते, योगेश भोर, संतोष क्षीरसागर, विशाल पगार, अजय पाटील, डी. एस. कैकाडी, यश अमेसर, सुमीत राहटळ, रामदास राहटळ, संजय घुले, तेजस ताजनपुरे यांनी केले. 

हेही वाचा - तरुणाच्या आत्महत्येसाठी पुन्हा पोलीसच जबाबदार? चिठ्ठीत धक्कादायक खुलासा

प्रभाग १ ते ६ मध्ये विकासकामांचा प्रारंभ 

म्हसरूळ : पंचवटी विभागातील प्रभाग १ ते ६ मधील विविध विकासकामांचा प्रारंभ झाला. मुख्य रस्ते, कॉलनी रस्ते, तसेच मागासवर्गीय वस्तीतील रस्ते, पावसाळी गटार व ड्रेनेज लाइन टाकण्यासाठी फोडलेल्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण, डांबरीकरण, खडीकरण कामांचे भूमिपूजन झाले. तसेच पंचवटी विभागातील प्रभाग २, ३, आणि ४ मध्ये नवीन जलकुंभ बांधणे आणि मुख्य जल वितरण वाहिन्याच्या नऊ कोटी रुपये खर्चाच्या कामांचे भूमिपूजन झाले. याप्रसंगी स्थायी समिती सभापती गणेश गिते, नगरसेवक हेमंत शेट्टी, कमलेश बोडके आदी उपस्थित होते.