विकासकामांत ठेकेदारांसोबत नगरसेवकांची ‘पार्टनरशिप’; नोंद काहीही असो मालक नगरसेवकच

नाशिक  : पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने शहरभर मोठ्या प्रमाणात रस्त्यांपासून ते ड्रेनेजपर्यंतची अनेक कामे सुरू आहेत. मात्र, यातील बहुतांश कामांमध्ये नगरसेवकच पार्टनर असल्याची बाब समोर येत असून, नियमाप्रमाणे नगरसेवकांना थेट कामे घेता येत नाहीत. गैरवापर केला म्हणून पद रद्ददेखील होऊ शकते. त्यातून कागदावर काम मिळाल्याची नोंद काहीही असली तरी प्रत्यक्षात कामाचा मालक नगरसेवकच असल्याने सेवक व ठेकेदार अशा दोन्ही भूमिका निभावल्या जात आहेत. 

नगरसेवकांची कामे झाली नसल्याचा आरोप

२०१७ मध्ये महापालिकेची निवडणूक झाली. या निवडणुकीत पन्नासहून अधिक नगरसेवक प्रथमच निवडून आले. त्यामुळे पहिले वर्ष महापालिकेचे कामकाज समजून घेण्यातच गेले. त्यानंतर आयुक्तपदी तुकाराम मुंढे आले. त्यांनी वॉर्डनिहाय काम करण्याऐवजी सर्व कामांची एकत्रित निविदा काढण्यास सुरवात केल्याने विभागनिहाय कामे घेता आली नाहीत. त्यातही दायित्वाचा भार कमी करण्याकडे त्यांचा कल राहिल्याने निधी देयके देण्यातच खर्च झाला. वर्षभर नगरसेवकांची कामे झाली नसल्याचा नगरसेवकांचा आरोप आहे. त्यानंतर आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर राधाकृष्ण गमे यांच्या कार्यकाळात कामांना गती मिळाली. मात्र, मार्च २०२० मध्ये कोरोना संसर्ग वाढल्याने लॉकडाउन जाहीर करण्यात आला. लॉकडाउनमुळे नागरिकांना बाहेर पडता न आल्याने कामे ठप्प झाली. आता पुढील वर्षी महापालिकेच्या निवडणुका असल्याने आयुक्तांकडे विकासकामांचा तगादा लावल्याने मागील वर्षातील कामे व प्रस्तावित कामे सुरू करण्यात आली आहेत. डिसेंबरपर्यंत दिखावू स्वरूपातील कामे करण्याकडे कल दिसून येत आहे. शहरात रस्ते, ड्रेनेज, फुटपाथ, उद्यानांची दुरुस्ती, बेंचेस बसविणे, रंगरंगोटी आदी कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत; परंतु कामे ठेकेदारामार्फत होत असल्याचे वरकरणी दिसत असले तरी नगरसेवकच पार्टनर असल्याचे बोलले जात आहे. 

हेही वाचा - दशक्रियाची विधी पडली महागात! वारंवार सांगूनही नियमांची एैशीतैशी; परिसरात खळबळ

प्रस्तावापासून ते अंतिम देयकापर्यंत नगरसेवकांचा सहभाग 

नगरसेवकांकडून प्रभागातील कामे सुचवून संबंधित विभागाकडे प्रस्ताव सादर केले जातात. कामांचा अंदाजपत्रकात समावेश होतो किंवा दोन लाख रुपये किमतीच्या आतील काम असल्याने विभागीय स्तरावर कामाला मंजुरी मिळते. कामाचे वाटप नगरसेवकांनी सुचविलेल्या ठेकेदाराला होते, अशी आतापर्यंतची पद्धत आहे. आजही याच पद्धतीचा अवलंब होतो. मात्र, ठेकेदारांच्या कामात नगरसेवकच पार्टनर होत असल्याचे दिसून येत आहे. प्रस्ताव फिरविण्यापासून ते अंतिम देयके काढण्यापर्यंतच्या प्रवासात नगरसेवकांचा सहभाग असतो. नगरसेवकांच्या वजनामुळे जलदगतीने फाइल फिरते. त्यामुळे ठेकेदारांकडूनदेखील नगरसेवकांना पार्टनर करून घेतले जात आहे. जुने नाशिक, सिडको, नाशिक रोड, मध्य नाशिक, इंदिरानगर भागात सध्या सुरू असलेल्या कामात नगरसेवकच पार्टनर झाल्याचे दिसून येत आहे. 

हेही वाचा - स्‍वयंपाकगृह ते थेट 'CA'! गिरणी व्‍यावसायिकाच्या लेकीची उत्तुंग भरारी