विकासकामांसाठी भाजपकडून तीनशे कोटींचे कर्ज; शिष्टमंडळाची विरोधी पक्षनेत्यांकडे मागणी

नाशिक : शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे सरू असून, या कामांना निधी अपुरा पडणार आहे, त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून तीनशे कोटींचे कर्ज काढण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महापौर सतीश कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने बुधवारी (ता.१३) केली. 

२०१८ मध्ये तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यामुळे वर्षभर कामे झाली नाहीत व कोरोनामुळे एक वर्ष वाया गेल्याने विकासकामांना ब्रेक लागला आहे. पंचवार्षिकमधील यंदाचे शेवटचे वर्ष असल्याने नगरसेवकांना कामांची आवशक्यता आहे. सध्या सुरू असलेल्या कामांसाठी निधीची गरज असल्याने निधीची मागणी करण्यात आली. महापौर सतीश कुलकर्णी, स्थायी समिती सभापती गणेश गिते, सभागृहनेते सतीश सोनवणे, गटेनेते जगदीश पाटील, आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी श्री. फडणवीस यांना निवेदन दिले. विशेष म्हणजे अत्यावश्यक विकासकामांसाठी ३०० कोटींचे कर्ज काढण्याची विनंती श्री. फडणवीस यांनी मान्य केल्याचा दावा करण्यात आला. आमदार सीमा हिरे, ॲड. राहुल ढिकले, डॉ. राहुल आहेर, शहराध्यक्ष गिरीश पालवे, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा हिमगौरी आडके आदी उपस्थित होते. 

हेही वाचा > संतापजनक प्रकार! शेजारीणच झाली वैरीण; 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला दिले नराधमांच्या ताब्यात

केंद्राकडे व्हावा पाठपुरावा 

- नमामी गंगा प्रकल्पाच्या धर्तीवर गोदावरी व उपनद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी केंद्र सरकारडे प्रलंबित प्रस्ताव मंजूर व्हावा 
- अमृत योजनेंतर्गत २२५ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेसाठी केंद्र सरकारकडून निधी मिळावा 
- शहरातील पाचशे उद्याने विकसित करण्याबरोबरच प्राणिसंग्रहालय उभारण्यासाठी अर्थसहाय्य मिळावे 

विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज आहे. कोरोनामुळे उत्पन्नात घट झाली आहे. पंचवार्षिकमधील शेवटचे वर्ष असल्याने विकासकामांसाठी निधीची गरज असल्याने ३०० कोटींच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. 
-सतीश कुलकर्णी, महापौर 

हेही वाचा > बहिणीच्या लग्नात भावाने दिले अनोखे 'गिफ्ट'; अख्ख्या पंचक्रोशीत होतेय चर्चा

भाजपच्या सत्ताकाळात उत्पन्न वाढविण्यासाठी एकही ठोस योजना झाली नाही. घरपट्टी व पाणीपट्टीची थकबाकी वसुलीसाठी कुठलेच प्रयत्न झाले नाहीत. याउलट दत्तक पित्याकडे ३०० कोटींचे कर्ज काढण्यासाठी नाशिक गहाण ठेवण्याची मागणी करणे, हा नाशिककरांचा विश्‍वासघात आहे. 
- अजय बोरस्ते, विरोधी पक्षनेते, महापालिका