विकासाबरोबरच पर्यावरणाची सांगड! महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासाठी स्वतंत्र विकास आराखडा 

नाशिक : शहरांकडून ग्रामीण भागाकडे जाताना पायाभूत सुविधांच्या बाबतीत ‘विकास व भकास’ असे दोन वेगळे चित्र दिसत असल्याने विकासाबरोबरच पर्यावरणाची सांगड घालण्याच्या दृष्टीने शहराला लागून असलेल्या २७५ गावांचा समावेश असलेल्या नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नगररचना विभागाला त्या संदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या या निर्णयामुळे शहराला लागून असलेल्या ग्रामीण भागाच्या विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे. 

मुंबई, पुणे व नाशिक या सुवर्णत्रिकोणात नाशिक शहर वगळता अन्य भाग अद्यापही अविकसित आहे. पाणी, जमीन मुबलक प्रमाणात असतानाही विकासापासून दूर राहिलेल्या या भागाला नवसंजीवनी मिळावी, यासाठी २७५ गावांचा समावेश असलेले नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे; परंतु मुंबई, पुणे, नागपूर प्राधिकरणाच्या तुलनेत नाशिक विकास प्राधिकरण अद्यापही बाल्यावस्थेतच आहे. निधीची कमतरता हे प्रमुख कारण त्यामागे सांगितले जाते. राज्य शासनाने डिसेंबर महिन्यात एकात्मिक शहर विकास नियंत्रण नियमावली जाहीर केल्याने मोठ्या प्रमाणात विकासाला चालना मिळणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर नाशिक शहरालगत असलेल्या गावांचाही विकास होणे गरजेचे असल्याने प्राधिकरणासाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. 

गावांचे रस्ते महानगराला जोडणार 

नाशिक शहराकडून ग्रामीण भागाकडे प्रवास करताना ग्रामीण भागात पायाभूत सुविधांची कमतरता दिसून येते. त्यामुळे २७५ गावांमध्ये महापालिकेप्रमाणेच स्वतंत्र विकास आराखडा तयार केला जाणार आहे. रस्ते, खेळाची मैदाने, उद्याने, शाळा, रुग्णालये यासाठी जमिनींवर आरक्षण टाकले जाणार आहे. ग्रामीण भागातील रस्ते शहराच्या रिंग रोड व मुख्य रस्त्यांना जोडले जातील जेणेकरून कनेक्टिव्हिटी वाढण्याबरोबरच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम होईल. ग्रामीण भागात अधिक लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये स्वच्छ पाणीपुरवठा, मलनिस्सारण केंद्रांची निर्मिती केली जाणार आहे. 

हेही वाचा > तो शेवटचा विवाहसोहळा! काही समजण्याच्या आतच विवाहितेची जीवनयात्रा संपली; वाडीचौल्हेर गावात शोककळा

विकास प्राधिकरणाचे उद्दिष्ट 

-राहण्यायोग्य शहरांची निर्मिती करणे. 
-अत्याधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तयार करणे. 
-शेतीपूरक उद्योगांना चालना देणे. 
-वायनरी उद्योगांना चालना मिळण्यासाठी पर्यटन क्षेत्र विकसित करणे. 
-विकासाचा पर्यावरणाशी सांगड घालून ग्रीन नाशिक संकल्पना राबविणे. 
-लॉजिस्टिक पार्क तयार करणे. 
-धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने पायाभूत सुविधा निर्माण करणे. 

नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची वैशिष्ट्ये 
-२१ मार्च २०१७ रोजी स्थापना 
-जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ- १५,५३० चौरस किलोमीटर 
- २६४९.१४ चौरस किलोमीटर क्षेत्राचा प्राधिकरणात समावेश- एकूण १८ टक्के क्षेत्रफळ 
- एकूण २७५ गावांचा समावेश 

 
नाशिक शहराप्रमाणेच लगतच्या ग्रामीण भागाचाही सुयोग्य रीतीने व नैसर्गिक सौंदर्य अबाधित राखून विकास होणे गरजेचे आहे. पर्यटन, रोजगाराला चालना यातून मिळेल. त्यासाठी २७५ गावांचा समावेश असलेल्या नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार केला जाणार आहे. 

-राधाकृष्ण गमे, विभागीय आयुक्त, नाशिक विभाग  

हेही वाचा > ''माझ्या बायकोला आधी वाचवा हो'', रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नवऱ्याचा आक्रोश; दुर्देवी घटना