‘विकेल ते पिकेल’ : शहरात दर शनिवारी शिवसेना भरविणार भाजी बाजार 

नाशिक :  ‘पिकेल तिथे विकेल’ या संकल्पनेनुसार शिवसेनेतर्फे प्रभाग सातमधील बालगणेश उद्यानात पहिला आठवडेबाजाराला प्रारंभ झाला. शहरात पहिल्यांदाच शेतकऱ्यांनी पिकवलेला शेतमाल, पालेभाज्या, फळे कोणताही मध्यस्थी न टाकता थेट ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आल्याने नागरिकांसह व्यावसायिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. शिवसेनेतर्फे शहराच्या विविध भागांमध्ये दर शनिवारी आठवडेबाजार भरविण्याचा निर्णय घेण्यात आला. 

२० ते २५ टक्के स्वस्त दराने भाजीपाला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आठवडेबाजार संकल्पनेनुसार महापालिकेचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी सबसे अच्छा शेतकरी गटाच्या सहकार्याने प्रभाग क्रमांक सातमधील बालगणेश उद्यानात पहिला आठवडेबाजार भरविला. गटनेते विलास शिंदे, नगरसेवक संतोष गायकवाड, दीपक हांडगे, संजय घोडके, आनंद फरताळे, अमित बोरस्ते, हर्षल पाटील, पंकज सोलंकी, कल्याण जांभेकर, समीर देवघरे, प्रसाद बागूल, कुणाल पोतदार आदी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या मालाला बाजारात चांगला भाव मिळत नसल्याने आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहे. शहरातील नागरिकांनाही भाजीपाला वाढीव दरात विकत घ्यावा लागतो. शेतकरी ते ग्राहकांमधील मध्यस्थ मात्र दिवसाला मोठा नफा कमवितात. यातून मार्ग काढण्यासाठी शासनाने ‘विकेल ते पिकेल’ योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत शहरात आजपासून उपक्रम सुरू करण्यात आला. चालू बाजाराच्या २० ते २५ टक्के स्वस्त दराने भाजीपाला उपलब्ध करून देण्यात आला आहे. नाशिककरांनी आठवडेबाजारास भेट देऊन शेतमाल खरेदी करण्याचे आवाहन  बोरस्ते यांनी केले. 

हेही वाचा - धक्कादायक! तपोवन परिसरात आढळला युवतीचा विवस्त्र मृतदेह; परिसरात खळबळ

शहरात आठवडेबाजार 

‘विकेल ते पिकेल’ योजनेंतर्गत शिवसेनेने आज आठवडेबाजाराचा प्रारंभ केला. पहिल्याच आठवडेबाजाराला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता शहरातील विविध भागांमध्ये दर आठवड्याच्या शनिवारी बाजार भरविण्याचा निर्णय झाल्याची माहिती बोरस्ते यांनी दिली.   

हेही वाचा - दुर्दैवी! एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद; दुसरीकडे क्षणार्धात भावाची निघाली अंत्ययात्रा