विजेचे वेळापत्रक बदलल्याने बळीराजाची धावपळ; पीक वाचविण्यासाठी थंडीत काम करण्याची वेळ 

दिक्षी (नाशिक) : १ डिसेंबरपासून ग्रामीण भागातील शेती वीज भारनियमन वेळापत्रकात महावितरणकडून बदल केल्याने कडाक्याच्या थंडीत कुडकुडत रब्बी पिकांसह नगदी पिके वाचविण्यासाठी धावपळ करण्याची वेळ आली आहे.

निफाड तालुक्यातील दिक्षी फीडरवरील नवीन वेळापत्रकात रात्री आठ ते सकाळी सहा व सात ते दुपारी तीन या वेळेस थ्री फेज वीजपुरवठा केला जाणार असल्याने शेतकऱ्यांना पिकांचे सिंचन करण्यासाठी रात्रीचा दिवस करावा लागत असून, त्रासलेल्या शेतकऱ्यांनी दिवसा वीजपुरवठा करण्याची मागणी दिक्षीसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी केली आहे. 

दिवसा वीजपुरवठा मिळावा

सध्या रब्बी पिकांची पेरणी, कुठे कांदा, ऊस, गहू, हरभरे पिकांच्या सिंचनाचे काम सुरू झालेले आहे. यातच द्राक्ष हंगाम सुरू आहे. १ डिसेंबरपासून महावितरणकडून शेती वीज भारनियमन वेळापत्रकात बदल करण्यात आल्याने वीज नसल्याने शेतकऱ्यांना रात्री जागरण करीत पिकांना पाणी द्यावे लागते आहे. सध्या थंडीचा जोर वाढत चालला आहे. रात्री वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर रोहित्रांवर अनेक तांत्रिक बिघाड होत असतात. ते दुरुस्तीसाठी रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांना धावपळ करावी लागते. त्यामुळे शेतकरी दिवसा वीजपुरवठा मिळावा, अशी मागणी करीत आहेत. 

हेही वाचा > क्रूर नियती! तो' एक सेल्फीचा मोह अनावर; अन् माऊली लेकरांपासून दुरावली कायमची

वन्य प्राण्यांच्या हल्ल्याचा धोका 

तालुक्यात बिबट्यांचा मुक्तसंचार असल्याने शेतीकामासाठी शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून काम करावे लागत आहे. यातच साप, विंचू यांच्यापासूनही त्यांना धोका असतानाही त्या अडचणींना सामोरे जावून काम करावे लागत आहे. 

दिवसभर शेतात राबल्यानंतर पुन्हा रात्री कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांना शेतात पाणी द्यायला जावे लागते. त्यामुळे नव्याने जाहीर झालेले वेळापत्रक रद्द करण्याची मागणी आमदार दिलीप बनकर यांच्याकडे केली आहे. 
-निवृत्ती धनवटे, संचालक- कृषी उत्पन्न बाजार समिती, पिंपळगाव 

हेही वाचा > नियतीची खेळी! लेकाला जेवण घेऊन माऊली आली शेतात; आणि घरी घडले भलतेच

आम्हा शेतकऱ्यांना दिवसभर शेतात राबूनही शेतकऱ्याला रात्री पिकाला पाणी देण्यासाठी जावे लागते. अनेकदा प्राण्यांचे हल्ले, सर्पदंश, विंचूदंश होत असतो. त्यामुळे वेळेत बदल व्हावा. 
-संगीता चौधरी, सरपंच दिक्षी