विठेवाडीत कांद्यापिकावर शेतकऱ्यांनी फिरवला नांगर; बदलत्या वातावरणामुळे शेतकरी त्रस्त

देवळा (जि. नाशिक) : जिल्ह्यातील शेतकरी मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या अतिवृष्टी, अवकाळी पाऊस अशा संकाटांनी ग्रासला आहे. आता  मोठ्या कष्टांनी वाढवलेल्या पिकांवर बदललेल्या हवामानामुळे वेगवेगळ्या रोगांचा प्रार्दुभाव वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नेमके जगायचे तरी कसे असा प्रश्‍न निर्माण झाला आहे..

विठेवाडी (ता. देवळा) येथील शेतकऱ्यांनी बदलत्या वातावरणामुळे कांदा पिकावर अनेक रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनापेक्षा जास्त प्रमाणात खर्चाला व या आसमानी संकटाला कंटाळून दीड एकर क्षेत्रावर, तर सरस्वतीवाडी येथील शेतकऱ्याने साडेतीन एकर क्षेत्राच्या उन्हाळ कांदापिकावर नांगर फिरवला. प्रतिकूल वातावरणात कांदारोप तयार करूनही कांदापिकावर पुन्हा तशीच परिस्थिती उद्भवल्याने असे पाऊल उचलल्याचे सांगण्यात आले. 

हेही वाचा>> अवघ्या पंचक्रोशीचे काळीज हेलावले! जेव्हा लष्करी अधिकारी 'तिरंगा' वीरपत्नी धारित्रींना सुपूर्द करतात तेव्हा...

कांद्याची निर्यातबंदी उठवावी

खर्चाचा विचार केला, तर चार ते पाच हजार रुपये प्रतिकिलोचे कांदा बियाणे खरेदी करून त्यात दुबार-तिबार पेरणी करावी लागली. रोप तयार करून कांदा लागवड झाली; पण बदलत्या अवकाळी पावसाच्या वातावरणामुळे कांदा पिकावर करपा, बुरशीजन्य रोगांचे आक्रमण झाल्याने उत्पादनाच्या आशा मावळल्याने नाईलाज म्हणून राजेंद्र देवरे, श्रावण आहेर व इतर काही शेतकऱ्यांनी कांदापीक नांगरून टाकले. सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे निर्यातबंदी झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यात महावितरण वीजबिल वसुली, लागवडीच्या महिन्यात रात्रीची वीज यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. सरकारने वीजबिल माफ करावे, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ भरपाई मिळावी व कांद्याची निर्यातबंदी उठवावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. 

एकराचा सरासरी खर्च : 
कांदा बियाणे साधारण २५ ते ३० हजार रुपये; लागवडीसाठी १० ते १२ हजार रुपये; औषधे व खते आठ ते दहा हजार रुपये; इतर मजुरी- पाच हजार रुपये; एकूण- ५० ते ६० हजार रुपये 
 

हेही वाचा - दुर्दैवी! एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद; दुसरीकडे क्षणार्धात भावाची निघाली अंत्ययात्रा

शेतकऱ्यांनी कांदा लागवडीवेळी १००:५०:५० किलो NPIC खत व्यवस्थापन करणे, ५० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश याप्रमाणे NPU खते प्रतिहेक्टरी द्यावीत. त्याचबरोबर दहा किलो सल्फर प्रतिएकर याप्रमाणे लागवडीवेळी द्यावे. कांदा लागवड झाल्यानंतर १० ते १५ दिवसांच्या कालावधीत बावीस्टीन (०.१ टक्के)किंवा m -४५ (०.३ टक्के) या बुरशीनाशक द्रावणाने फवारणी करावी. 
- सचिन देवरे, तालुका कृषी अधिकारी