विदारक चित्र! हंडाभर पाण्यासाठी रानोमाळ भटकंती; एक हंडा पाण्यासाठी रात्री जागरण

पळसन (जि.नाशिक) : सुरगाणा तालुक्यातील म्हैसमाळ येथे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना घोटभर पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. एक हंडा पाण्यासाठी रात्री तीन ते चारपासून जागरण करून विहिरीवर शेकोटी करून पाण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. माणसांची ही अवस्था, तर मुक्या जनावरांची स्थिती यापेक्षाही गंभीर बनली आहे. 

म्हैसमाळ येथे पाण्याबरोबर चाऱ्याचा प्रश्‍नही गंभीर 
म्हैसमाळ हे गाव उंच डोंगरावर असून, चारही बाजूंनी डोंगर असल्यामुळे गावाला तीव्र पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. सुरगाणा तालुक्यात शेतीबरोबरच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्‍नही गंभीर होत आहे. पाणी व चाऱ्याच्या कमतरतेमुळे शेतकरी जनावरांना अर्ध्यापोटी ठेवू लागले आहे. उपलब्ध पाण्यावरच चार-पाच जनावरांची तहान भागवली जाते. चाऱ्याचा प्रश्‍नही गंभीर आहे. रानातून पालापाचोळा गोळा करून जनावरांना टाकावा लागत आहे. त्यातही प्रत्येक जनावराला मूठभर चारा दिला जातो. ज्या पाझर तलावात पाणी राहत होते तो पाझर तलाव पावसाळ्यात पाण्याने फुटल्याने पाणीटंचाईत अधिकच भर पडली आहे. 

हातावर पोट भरणाऱ्या नागरिकांची व्याकूळता
महावितरणकडून अवेळी वीजपुरवठा होत असल्यामुळे नागरिक रडकुंडीला आले आहेत. वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे शेतकरी रॉकेलच्या दिव्यावर दिवस काढू लागले आहेत. खर्च अफाट आणि उत्पन्न मर्यादित असल्यामुळे हातावर पोट भरणाऱ्या नागरिकांची व्याकूळता वाढली आहे. 
तालुक्यात अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणीटंचाई निर्माण होण्यास कारणीभूत असणाऱ्या अपूर्ण पाणीपुरवठा योजनेची चौकशी होणे गरजेचे आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातर्फे तालुक्यातील अनेक गावांना राष्ट्रीय पेयजल योजना, भारत निर्माण योजना, जलस्वराज्य या योजनांना अनेक गावांत मंजुरी दिली होती. लोकसंख्येवर आधारित असलेल्या योजनांवर मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. मात्र या योजना भ्रष्टाचाराचे कुरण बनल्या आहेत. त्यामुळे तालुक्यातील या योजनांची चौकशी करण्याची मागणी होत आहे. 

हेही वाचा  - ''पुजा चव्हाणच्या मोबाईलवर संजय राठोड यांचे 45 मिस्डकॉल''; चित्रा वाघ यांचा नाशिकच्या पत्रकार परिषदेत दावा

तत्काळ टँकर सुरू करावा

म्हैसमाळ गावाला दर वर्षी पाणीटंचाई पाचवीलाच पुजलेली असते. रानोमाळ फिरून दूषित पाणी प्यावे लागते. त्या मुळे अनेक बालकांना पोटाचे विकार जडले आहेत. लोकप्रतिनिधींचेही याकडे दुर्लक्ष होत आहे. या गावाला शासनाने तत्काळ टँकर सुरू करावा, अशी मागणी होत आहे. 

हेही वाचा - अवघ्या चारच दिवसांवर बहिणीचं लग्न अन् लग्नघरातूनच निघाली अंत्ययात्रा; दुर्दैवी घटना

जलअभियानाचा बट्ट्याबोळ 
म्हैसमाळ येथे पाणी प्रकल्पाचे सोशल नेटवर्किंग फोरम जलअभियानातून मुंबई करूणा चॅरिटेबल ट्रस्ट, हैदराबादच्या श्री. जे. एस. नरसिंहम या सामाजिक संस्थांच्या पुढाकारातून १७ डिसेंबर २०२० ला दिमाखात उद्‌घाटन झाले. त्यामुळे गावात उत्साहाचे वातावरण पहायला मिळाले. मात्र पहिल्याच दिवशी गावात पाणी आले. दुसऱ्या दिवसापासून पाणी गायब झाले. टंचाई दूर करण्यासाठी उपाययोजना केल्या; परंतु विजेअभावी या योजनेचा बट्ट्याबोळ झाला.