विद्यापीठाच्या ऑनलाइन सराव परीक्षेची सिस्टिम अनॲक्टिव्ह; विद्यार्थी संभ्रमात

मालेगाव कॅम्प (जि.नाशिक) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा १० एप्रिलपासून ऑनलाइन होणार आहेत. सदर परीक्षा कशी असेल, यासाठी सराव परीक्षा (मॉक अप टेस्ट) ५ एप्रिल ते ९ एप्रिल, या काळात सकाळी दहा ते दुपारी तीन, या वेळात घेतली जाणार होती. या सराव परीक्षेचा पीआरएन क्रमांक व पासवर्ड सिस्टिमवर लिंक केला, की ॲक्टिव्ह होत नसल्याने परीक्षेच्या आधीच विद्यार्थी संभ्रमात पडले आहेत. 

विद्यापीठाच्या ऑनलाइन सराव परीक्षेची सिस्टिम अनॲक्टिव्ह
यंदा प्रथम वर्ष ते अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या नियमित अनुशेष, रिपिटर परीक्षा मार्गदर्शक तत्त्वे नुकतीच विद्यापीठाने जाहीर केली. दरम्यान, गेल्या तीन दिवसांत मॉक टेस्टसाठी वस्तुनिष्ठ स्वरूपाची परीक्षा नमुना पद्धतीने घेण्यात येणार होती. मात्र, सदर परीक्षेच्या सराव परीक्षेचा पुरता फज्जा उडाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येणार होत्या. तत्पूर्वी नमुना धर्तीवर अशा सर्व परीक्षांचे आयोजन विद्यापीठातर्फे करण्यात आले. एक तासाची परीक्षा पन्नास गुणांसाठी साठ प्रश्न परीक्षा फक्त ऑनलाइन बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असणार, असे विद्यापीठाने यापूर्वी जाहीर केले होते. ऑनलाइन वस्तुनिष्ठ परीक्षा पद्धती चांगली असली तरी तांत्रिकदृष्ट्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांना जोडणे क्लिष्ट प्रकिया वाटत आहे.

हेही वाचा - नांदगाव हत्याकांडाचे गुढ अखेर उलगडले! नऊ महिने अन् दिडशे जबाबानंतर पोलिसांना यश

विद्यार्थी संभ्रमात

१० एप्रिलपूर्वी परीक्षार्थींचा सराव होणे गरजेचा असून, परीक्षा नियंत्रण विभागाने याकडे लक्ष घालून तत्काळ तांत्रिक त्रुटी दुरुस्ती करून विद्यार्थ्यांच्या मॉक अप टेस्ट घेऊनच ऑनलाइन परीक्षा घ्यावी, अशी मागणी विद्यार्थी संघटनांनी केली आहे. दरम्यान, या संदर्भात विद्यापीठ प्रतिनिधी व सीनेट सदस्यांशी संपर्क केला असता, ते उपलब्ध झाले नाही.  

हेही वाचा - जेव्हा लसीकरण केंद्रावर पोचला 'कोरोनाबाधित'..! उपस्थितांमध्ये पळापळ आणि खळबळ