विद्यार्थ्यांसाठी आनंदवार्ता! तब्बल १० महिन्यांनंतर बहरणार वरिष्ठ महाविद्यालये; पुणे विद्यापीठातर्फे सूचना जारी

नाशिक : कोरोनाच्‍या प्रादुर्भावामुळे गेल्‍या दहा महिन्‍यांपासून बंद असलेले वरिष्ठ महाविद्यालय प्रांगण येत्‍या सोमवार (ता.१५) पासून बहरणार आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्‍या घोषणेनंतर व शासनाने परीपत्रक जारी केल्‍यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानेदेखील सूचना जारी केली आहे.

अखेर विद्यार्थ्यांच्या मागणीला यश

गेल्‍या गुरुवारी (ता.४) पुणे विद्यापीठाने यासंदर्भात परीपत्रक जारी केले आहे. प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया विलंबाने सुरू झाली असली तरी द्वितीय, तृतीय व चौथ्या वर्षाच्‍या विद्यार्थ्यांचे अध्ययन प्रक्रिया सुरू झालेली होती. महाविद्यालये बंद असल्‍याने ऑनलाइन अध्ययन प्रक्रियेवरच सर्व विद्यार्थ्यांची भिस्‍त होती. परंतु ऑनलाइन अध्ययन प्रक्रियेत अनेक अडथळे येत असल्‍याने विद्यार्थ्यांच्‍या तक्रारी वाढत होत्‍या. कनिष्ठ महाविद्यालये सुरू झाल्‍याने आता वरीष्ठ महाविद्यालयांनाही परवानगी मिळावी, अशी मागणी जोर धरत होती. त्‍यातच शासनाने यासंदर्भात निर्णय जारी केल्‍यानंतर पुणे विद्यापीठानेही पत्रक जारी केले आहे. 

हेही वाचा- रस्त्यावर फेकलेली 'नकोशी' झाली 'हवीशी'! नुकत्याच जन्मलेल्या शकुंतलाला मिळाले आई-बाबा

स्‍थानिक प्राधिकरणाची संमती आवश्‍यक 

विद्यापीठाने जारी केलेल्‍या पत्रकात म्‍हटले आहे, की कोविड-१९ मुळे उद्भवलेल्‍या परीस्‍थितीत मार्च २०२० पासून विद्यापीठ विभाग व महाविद्यालयांमध्ये नियमित वर्गातील अध्यापन बंद आहे. विद्यार्थ्यांच्‍या हिताच्‍या दृष्टीने विद्यापीठ व संलग्‍नित महाविद्यालयांमध्ये कोविड प्रतिबंधात्‍मक सर्वसाधारण उपाययोजना करून नियमित वर्गातील अध्यापन सुरू करण्याबाबत युजीसी व शासनाने निर्देश जारी केले आहेत. गेल्‍या वर्षी ५ नोव्‍हेंबरला युजीसीने जारी केलेल्‍या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत महाविद्यालयातील नियमित वर्ग सुरू करण्याचे स्‍पष्ट केले आहे. स्‍थानिक प्राधिकरणांची सहमती घेऊन महाविद्यालयांत अध्यापनाचे वर्ग सुरू करावे, असे स्‍पष्ट केले आहे. यामुळे स्‍थानिक प्राधिकरणाची संमती आवश्‍यक असून युजीसीने जारी केलेल्‍या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे लागणार आहे. 

हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच

महाविद्यालय सुरू होताच परीक्षा? 

कोविड-१९ च्‍या प्रादुर्भावामुळे शैक्षणिक वेळापत्रक कोलमडले आहे. शैक्षणिक वर्षे सुरू झाल्‍यानंतर सत्र पद्धतीच्‍या परीक्षा साधारणतः डिसेंबर-जानेवारीत होत असतात. परंतु अद्यापपर्यंत महाविद्यालये बंद होते. आता महाविद्यालये सुरू होणार असले तरी लागलीच विविध अभ्यासक्रमांच्‍या परीक्षा देखील घेतल्‍या जाऊ शकतात, असे जाणकारांचे म्हणणे आहे.