विद्रोही साहित्‍य संमेलनाध्यक्षपदी कोल्‍हापूरचे डॉ. आनंद पाटील यांची निवड

नाशिक : मराठा विद्याप्रसारक समाज संस्‍थेच्‍या मैदानावर येत्या २५ व २६ मार्चला होत असलेल्या पंधराव्‍या विद्रोही मराठी साहित्‍य संमेलनाच्‍या अध्यक्षपदी आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक तुलनाकार, कथाकार, समीक्षक आणि शिवइतिहासकार डॉ. आनंद पाटील (कोल्हापूर) यांची निवड झाली. दरम्यान, उद्‌घाटक म्हणून ग्रेटा थनबर्ग हिच्‍यासह आंतरराष्ट्रीय अभिव्‍यक्‍ती स्‍वातंत्र्याच्‍या लढाईतील कार्यकर्त्यांशी चर्चा सुरू असल्‍याची माहिती संयोजकांनी मुंबईत पत्रकार परिषदेत दिली. 

मोदी-शहांच्या मनुवादी राजवटीत मानवी मूल्यांना पायदळी तुडवले जात आहे. राज्यघटनेने जनतेला दिलेले हक्क काढून घेण्याचे काम सुरू असल्‍याचा आरोप संयोजकांनी केला. त्‍यामुळे संविधान सन्मानार्थ पंधरावे विद्रोही मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये होत आहे. महात्‍मा फुलेप्रणीत सत्यशोधक चळवळ, राजर्षी शाहूप्रणीत बहुजन शिक्षण चळवळ, शेतमालाचे रास्त भाव आंदोलनासाठी संघर्षशील, डॉ. बाबासाहेब आंबेडकरप्रणीत जातीअंतांच्या संगरासाठी, आदिवासी जंगल उठावासाठी, भूमिहीन, जमीन हक्क सत्याग्रहासाठी व अलीकडील शेतकरी संपासाठी जिल्‍हा प्रख्यात असल्याचे या वेळी सांगण्यात आले. संमेलनाध्यक्षपदी डॉ. पाटील यांच्‍या निवडीची घोषणा विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्‍या महाराष्ट्राच्या अध्यक्ष प्रा. प्रतिमा परदेशी व सचिव यशवंत मकरंद, राज्य कार्यकारी संघटक किशोर ढमाले, नाशिक संमेलनाचे स्वागताध्यक्ष शशी उन्हवणे, मुख्य संयोजक राजू देसले यांनी केली. 

हेही वाचा - अवघ्या चारच दिवसांवर बहिणीचं लग्न अन् लग्नघरातूनच निघाली अंत्ययात्रा; दुर्दैवी घटना

डॉ. आनंद पाटील यांचा परिचय व साहित्यसंपदा 

डॉ. आनंद पाटील निर्भीडपणा व अफाट आंतरविद्याशाखीय व्यासंगामुळे ओळखले जातात. वैचारिक, ललित, प्रवासवर्णन, कथा, नाटक आदी सर्व पद्धतीचे लेखन करून त्यांनी मराठी, ग्रामीण व इंग्रजी साहित्यात मोलाची भर घातली आहे. ‘कागूद’ आणि ‘सावली’ या त्यांच्या दोन लघुकांदबऱ्या गाजल्या. रयत शिक्षण संस्थेची विविध महाविद्यालये व गोवा विद्यापीठाच्या इंग्रजी विभागात, नवी दिल्ली विद्यापीठ, उत्तर गुजरात विद्यापीठ, नागपूर विद्यापीठ या विद्यापीठांचे ते अभ्यागत प्राध्यापक होते. त्यांची ‘कागूद’ (१९८२) ही गिरणी कामगारांच्या जीवनावरील पहिली लघुकादंबरी ठरली. त्यानंतर इच्छामरण (२००८) कादंबरी लिहिली. युरोप (१९८६), बांगलादेश (१९९१), अमेरिका (१९९६), चीन (२००१), हॉलंड (२००२), बँकॉक (२००३), दक्षिण कोरिया (२००४) आणि भारतभर व्याख्यानांमुळे सांस्कृतिक तुलनाकार लेखक ही त्‍यांची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर तयार झाली.

ऑक्सफर्ड व केंब्रिज विद्यापीठांच्या प्रकाशनांमध्ये त्यांचे लेख प्रसिद्ध झाले असून, त्‍यांच्‍या इंग्रजी लिखाणाचा अंतर्भाव भारतीय विद्यापीठांनी आठ पुस्तकांमध्ये केला आहे. त्‍यांनी मराठीत दोन, इंग्रजीत एक अशी प्रवासवर्णने लिहिली आहेत. त्यातील ‘पाटलाची लंडनवारी’ हिंदी व कन्नडमध्ये अनुवादित झाली. ते मार्जिनल माणसाचे पहिले भारतीय प्रवास लेखक म्हणून मान्यता पावले. तौलनिक साहित्य व संस्कृती अभ्यासातील मराठीत बारा व इंग्रजीमधील सहा ग्रंथ लिहिली आहेत. मराठीत त्यांच्या ‘महाराष्ट्राला माहीत नसलेले सम्राट शिवाजी’ या पुस्‍तकाने बेस्ट सेलरचा मान मिळविला. संधिसाधू देशीवाद, अनीतिवाद, वाङ्‌मय व संस्कृतीमधील टोळीबाज यावर नव्या संकल्पना व सिद्धांत वापरून निर्भयपणे प्रहार केले. त्याचबरोबर डॉ. पंजाबराव देशमुखांचा ऑक्सफर्ड विद्यापीठाने १९३३ मध्ये छापलेला आणि ब्रिटनच्या वाङ्‌मयीन वारसा म्हणून असलेला ‘द ओरिजिन ॲन्ड डेव्हलपमेंट ऑफ रिलिजन इन वेदिक लिटरेचर’चा मराठीत अनुवाद व संपादन त्‍यांनी केले आहे. 
 

हेही वाचा - ५० फूट खोल विहीर, आत ७३ वर्षांच्या आजी; दैवच बलवत्तर दुसरे काय! 

यांनी भूषविले आहे संमेलनाध्यक्षपद 

विद्रोही संमेलनाचे अध्यक्षपद यापूर्वी बाबूराव बागूल, डॉ. यशवंत मनोहर, डॉ. अजीज नदाफ, डॉ. आ. ह. साळुंखे, वाहरू सोनवणे, ऊर्मिला पवार, तारा रेड्डी, संजय पवार, जयंत पवार, प्रतिभा अहिरे, डॉ. श्रीराम गुंदेकर, तुळसी परब, आत्माराम राठोड, विमल मोरे, डॉ. प्रल्हाद लुलेकर यांसारख्या सर्जनशील साहित्यिकांनी भूषविले आहे.