विधात्या, काय छळ लावलास रे! तळवाडे दिगर परिसरात सलग पाचव्या दिवशी गारपीट

तळवाडे दिगर (जि. नाशिक) :  बागलाणच्या पश्चिम पट्‍ट्यातील तळवाडे दिगर परिसराला सलग पाचव्या दिवशी बुधवारी (ता. २४) अवकाळी पाऊस अन् गारपिटीने झोडपले. अस्मानी संकटाने शेतकरी पूर्णपणे मोडून पडला आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले असून, हे विधात्या, काय छळ लावलास रे..! अशी आर्त हाक देत आहेत. 

शेतकरी वर्ग व्यथित

गेल्या वर्षी पावसाळा चांगला असल्याने यंदा या परिसरात मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होते. शेतकऱ्यांनी महागडी बियाणे खरेदी करून ते शेतात टाकले. तेव्हापासून निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करत लागवड केली. चार महिने उन्हातान्हात राबून पीक तयार केले. तळवाडे दिगर, केरसाणे, पठावे दिगर, दसाणे, किकवारी, विरगाव, मुल्हेर, अंतापूर, ताहराबाद आदी गावांत गारपिटीने थैमान घातले आहे. उन्हाळ कांदा, भाजीपाला, फळबागा, गहू, हरभरा आदी पिके पावसाने जमीनदोस्त झाली आहेत. उभी पिके व काढणीला आलेला कांदा तसेच शेतात काढून ठेवलेला कांदा सडू लागला आहे. एकरी चाळीस ते पन्नास हजार रुपये खर्च करून चार महिन्यांपासून शेतात राबून हाताशी पिके आली होती. मात्र हातातोंडाशी आलेला घास निसर्ग हिरावून घेत असल्याने शेतकरी वर्ग व्यथित झाला आहे. 

 हेही वाचा - स्‍वयंपाकगृह ते थेट 'CA'! गिरणी व्‍यावसायिकाच्या लेकीची उत्तुंग भरारी

आता तरी थांब रे बाबा... 

शेताकडे पावले वळतात, पण शेताकडे पाहवत नाही. उभ्या पिकाचे होत्याचे नव्हते झाले. शेतातील कांदे सडले, टोमॅटो गळून पडले. फळबागांवर मदार होती, त्याही कोसळल्या. आता हातात काहीच शिल्लक राहिले नाही. पोरीचे लग्न, मुलांचे शिक्षण, सावकाराचे कर्ज, बॅंकांचे कर्ज, वीजबिल हे आता कसे फेडायचे, घरगाडा कसा ओढायचा, या विवंचनेतून ‘बस बाबा आता तरी थांब', अशी विनवणी बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील शेतकरी वरुणराजाला करताना दिसत आहे. पाच दिवसांपासून वादळी वारा व गारपिटीचे थैमान सुरू असून, शेतकरी अक्षरशः मेटाकुटीस आला आहे. बळीराजाचा जीव मात्र टांगणीला लागला आहे. 

हेही वाचा - दशक्रियाची विधी पडली महागात! वारंवार सांगूनही नियमांची एैशीतैशी; परिसरात खळबळ