विधान भवनाच्या प्रांगणात झिरवाळांनी धरला ठेका

नरहरी झिरवाळ,www.pudhari.news

दिंडोरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा 

आज जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने विधान भवनाचा परिसर आदिवासी पारंपारिक नृत्य आणि वाद्यांच्या गजराने दुमदुमून गेला. आदिवासी समाजाचे नेते तथा विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे दिंडोरी, पेठ, सुरगाणा या तालुक्यांतून आलेल्या आदिवासी बांधवांसमवेत पारंपरिक नृत्य आणि गायनात सहभागी झाले.

विधान भवनाच्या प्रांगणात त्यांनी आदिवासी नृत्यांवर ठेका धरला. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, माजी विधानसभा सदस्य राजू तोडसाम यांनी सर्व आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी स्वातंत्र्यसेनानी बिरसा मुंडा, क्रांतिवीर राघोजी भांगरे आणि क्रांतिवीर देवाजी राऊत यांच्या प्रतिमेस सर्वांनी पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करून वंदन केले. यावेळी उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी सर्व मान्यवरांचे तसेच अधिकारी वर्गाचे पारंपारिक आदिवासी पध्दतीने तसेच क्रांतिवीरांच्या मूर्ती भेट देऊन स्वागत केले. याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे, व सचिव डॉ. विलास आठवले यांच्यासह महाराष्ट्र विधानमंडळातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा : 

The post विधान भवनाच्या प्रांगणात झिरवाळांनी धरला ठेका appeared first on पुढारी.