मालेगाव (जि.नाशिक) : शहरातील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली आहे. मात्र कोरोना संसर्गाचा धोका व दुसऱ्या लाटेची भीती कायम आहे. यासाठी शहरवासीयांनी राज्य शासन व आरोग्य विभागाच्या प्रतिबंधक नियमांचे पालन करणे गरजेचे असताना शहरात असंख्य नागरिक विनामास्क फिरतात. आगामी काळात विनामास्क नागरिकांकडून दंडवसुलीसाठी महापालिका, पोलिस व महसूल प्रशासनाचे संयुक्त पथक शहरातील विविध भागांत दररोज कारवाई करणार असल्याचा इशारा आयुक्त त्र्यंबक कासार यांनी दिला.
प्रशासनकडून सर्व प्रकारची सतर्कता
महापालिकेत विभागप्रमुखांच्या बैठकीत आढावा घेत कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. महापालिका कार्यक्षेत्रात नागरिकांना मास्क वापर अनिवार्य आहे. लॉकडाउननंतर मिशन बिगिनअंतर्गत नागरिकांसाठी विविध गोष्टी, सोयी-सवलती सुरू व खुल्या करण्यात आलेल्या आहेत, परंतु अजूनही कोरोनाचा धोका कमी झालेला नाही. संभाव्य कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सर्व प्रकारच्याची सतर्कता बाळगत आहे. यासाठी शहरात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर मालेगाव महापालिका, महसूल व पोलिस प्रशासनाकडून दंडवसुलीची संयुक्त कारवाई करणार असल्याचे श्री. कासार यांनी सांगितले. कोरोनाचा संपूर्ण बीमोड करण्यासाठी सध्या प्रभावी लस किंवा औषध उपलब्ध नाहीत. सद्यःस्थितीत प्रतिबंध हाच उपचार असल्याने मास्क व सॅनिटायझरचा वापर आणि सामाजिक अंतर पाळणे आवश्यक आहे. शहरवासीयांनी मास्क लावूनच कामानिमित्त बाहेर पडावे. दंडाची कारवाई टाळावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
हेही वाचा - जन्मतः अंध घुबडाची श्रुती बनली "आई-बाबा"! कोरोना काळातील एक अनोखी कथा अन् प्रेमही
नागरिकांच्या निष्काळजीपणे वागण्याला लगाम
दरम्यान, मास्क न वापरणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा दोन दिवसांपूर्वीच अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी दिला होता. नागरिकांनी या इशारा व सूचनांना केराची टोपली दाखविली आहे. यासाठी आगामी काळात प्रशासनाने विविध भागात प्रत्यक्ष दंडात्मक कारवाई करून दंड वसूल केल्यास नागरिकांच्या निष्काळजीपणे वागण्याला लगाम बसेल.
हेही वाचा - ह्रदयद्रावक! जीवलग मित्राच्या मृत्यूनंतर अवघ्या दोन दिवसातच निघाली अंत्ययात्रा; अख्खे गाव हळहळले