विनामास्क फिरणाऱ्यांची रस्त्यावरच ॲन्टिजेन चाचणी! मनमाडला प्रशासनाची संयुक्त कारवाई 

मनमाड (जि. नाशिक) : विनामास्क विनाकारण फिरणाऱ्या बेजबाबदार नागरिकांना सध्या चांगलाच प्रसाद मिळत असून पालिका, पोलिस आणि आरोग्य प्रशासनाच्या साथीने अशा नागरिकांची ॲन्टिजेन चाचणी करण्यात येत आहे. पॉझिटिव्ह आल्यास थेट कोविड सेंटरमध्ये रवानगी, निगेटिव्ह आली तर दंडात्मक कारवाई केली जात असल्याने प्रशासनाच्या धडक कारवाईने नागरिकांनी चांगलाच धसका घेतला आहे. या मोहिमेचे नागरिकांकडून स्वागत होत आहे. 

पोलिसांची अनोखी शक्कल

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासनाने कडक निर्बंध घालून वीकेंड लॉकडाउन सुरू केला आहे. दिवसा जमावबंदी, तर रात्रीची संचारबंदी जाहीर केली आहे. शासनाच्या आदेशाला झुगारत अनेक नागरिक रस्त्याने टोळके करून उभे राहतात. रात्रीचे फिरताना दिसतात. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. अनेकांना आपल्या जिवास मुकावे लागत आहे. तरीही मनमाडकरांनी अद्यापही मनावर घेतलेले दिसत नाही, अशा स्थितीत विनामास्क विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या बेजबाबदार नागरिकांना चाप लावण्यासाठी मनमाडमध्ये प्रभारी पोलिस निरीक्षक गिते, पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार मुंडे आणि उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जी. एस. नरवणे यांनी अनोखी शक्कल लढविली.

हेही वाचा - ह्रदयद्रावक; वडिलांसह दोन्ही लेकांची अंत्ययात्रा, एकाच वेळी ३ कर्त्या पुरुषांच्या जाण्याने कुटुंबावर शोककळा

पोलिसांनी चौकाचौकांत बंदोबस्त ठेवून विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना अडवून रस्त्यावरच आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून त्यांची कोरोनाची ॲन्टिजेन चाचणी जागेवरच घेतली जात आहे. विशेषतः या चाचणीत पॉझिटिव्ह येणाऱ्या नागरिकांची थेट कोविड केअर सेंटरमध्ये रवानगी केली जात आहे. निगेटिव्ह चाचणी आलेल्या नागरिकांचे रस्त्यावर येण्याचे कारण योग्य नसेल, त्यांच्यावर विनाकारण रस्त्यावर फिरतोय म्हणून दंडात्मक कारवाई केली जात आहे. 

हेही वाचा - लग्नाच्या तयारीला लागलेल्या वधू-वरांचा हिरमोड! विसंगत आदेशामुळे 'वेडिंग इंडस्ट्री'त गोंधळ