विलंबित आयटीआर भरणाऱ्यांना पाच हजारांपर्यंत दंड

विलंबित आयटीआर भरणाऱ्यांना पाच हजारांपर्यंत दंड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

दरवर्षी आयकर रिटर्न भरण्याच्या तारखेला सातत्याने मुदतवाढ दिली जाते. यंदा मात्र मुदवाढीबाबतची कोणतीही घोषणा सरकारने केली नसल्याने उशिरा आयकर भरणाऱ्यांना १ रुपयांपासून ते पाच हजारांपर्यंतचा दंड मोजावा लागत आहे. आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै रोजी संपली आहे.

आयकर विभागाने आयटीआर भरण्यासाठी ३१ जुलै २०२३ ही तारीख निश्चित केली होती. प्राप्तिकर विभागाच्या मते, ३१ जुलैपर्यंत एकूण ६.५० कोटींहून अधिक आयटीआर दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी ३१ जुलै रोजी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ३६.९१ लाख आयटीआर दाखल करण्यात आले होते. पण ज्यांना अद्याप आयकर विवरणपत्र भरता आलेले नाही, अशांना विलंबित दंड भरून आयकर रिटर्न भरावे लागत आहे. दरवर्षी रिटर्न भरण्यासाठी अंतिम मुदतीनंतर पुन्हा मुदवाढ दिली जाते. यंदाही मुदतवाढ दिली जाईल, अशी अपेक्षा करदात्यांकडून वर्तविली जात होती. मात्र, याबाबतचे सरकारने कोणतीही घोषणा केली नसल्याने, विलंबित शुल्काचा भार करदात्यांना सोसावा लागत आहे.

दरम्यान, आयकर भरणाऱ्यांची संख्या अजूनही मोठी असून, दररोज विलंबित दंडासह हजारो आयकर रिटर्न फाइल केले जात आहेत. ही प्रक्रिया वर्षभर चालणार आहे. दरम्यान, ज्यांनी मुदतीमध्ये आयटीआर दाखल केले नाही, त्यांना कर कपातीचा तोटा सहन करावा लागत आहे. याशिवाय परतावा मिळण्यासदेखील विलंब होत असल्याच्या अनेकांच्या तक्रारी आहेत.

असा आकारला जातोय दंड

वार्षिक उत्पन्न पाच लाखांपर्यंत असलेल्या करदात्यांना विलंबाने आयटीआर भरण्यासाठी एक हजार रुपयांपर्यंत दर आकारला जात आहे. तर पाच लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या व्यक्तींना पाच हजारांपर्यंत दंडाची रक्कम मोजावी लागत आहे.

The post विलंबित आयटीआर भरणाऱ्यांना पाच हजारांपर्यंत दंड appeared first on पुढारी.