विवाह सोहळा बंदीने लग्नाळूंच्या आनंदावर विरजण; वधूपक्षांमध्ये भरली धडकी

जुने नाशिक : शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सोमवार (ता. १५)पासून विवाह सोहळ्यांवर पूर्णपणे बंदी घातली आहे. विवाह सोहळ्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना प्रशासनाकडून घातलेल्या बंदीने वधूपक्षांमध्ये धडकी भरली आहे. १५ मार्चनंतर विवाह तिथी असलेल्यांनी काय करावे, याचे कुठलेही मार्गदर्शन प्रशासनाने केले नसल्याने ‘इकडे आड अन् तिकडे विहीर’ अशी अवस्था वधूंच्या कुटुंबीयांची झाली आहे. 

वधू कुटुंबीयांवर मोठे संकट

शहर-जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. मिनी लॉकडाउन करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी शहरात सायंकाळी सात ते सकाळी सातपर्यंत अत्यावश्‍यक सेवा वगळता अन्य सर्व व्यवहारांवर बंदी घातली आहे, तर १५ मार्चनंतर होणाऱ्या विवाह सोहळ्यांवरही पूर्णपणे बंदी असल्याचे सांगितले. त्यामुळे १५ मार्चनंतरची विवाह सोहळ्यांची तारीख असलेल्या वधू कुटुंबीयांवर मोठे संकट ओढावले आले आहे. नियोजित वेळेत विवाह सोहळे केले तर प्रशासनाकडून कारवाईची शक्यता, रद्द केले तर वरपक्षाची नाराजी आणि तयारीसाठी केलेला खर्च वाया जाण्याची भीती. त्यामुळे वधूपक्षाची ‘इकडे आड आणि तिकडे विहीर’ अशी परिस्थिती झाली आहे. 

हेही वाचा - सोने-चांदीच्या दरात घसरण सुरुच; गेल्या १० महिन्यांत निच्चांकी स्तर
 

तयारी धुळीस मिळाल्याने नाराजी

जुने नाशिक येथील आवेश शेख यांच्या बहिणीचा विवाह बुधवारी (ता. २४) नियोजित केला होता. प्रशासनाच्या १५ मार्चनंतरच्या विवाह सोहळ्याच्या बंदीने या नियोजित विवाह सोहळ्यावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले. त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. फिरता भंगार व्यवसाय करून त्यांनी पहिल्या बहिणीचे लग्न केले. त्यानंतर दुसरी घरातील शेवटची मुलगी म्हणून दुसऱ्या बहिणीच्या विवाह सोहळ्याचे २४ मार्चला नियोजन केले. कुटुंबातील शेवटच्या मुलीचा विवाह सोहळा असल्याने कुटुंबीयांनी विविध तयारी करून ठेवली. बंदीच्या सूचनेने सर्व तयारी धुळीस मिळाल्याने त्यांच्यात नाराजी पसरली. सोहळ्याची तारीख ठरली असल्याने घरातल्या घरात साध्या पद्धतीने विवाह सोहळा उरकण्याची तयारी आता शेख कुटुंबीयांनी केली आहे. त्याचप्रमाणे वडाळागावातील रहिवासी शरीफ शेख यांच्या मुलीचा विवाह २ एप्रिलला करण्याचे ठरले आहे. त्यांच्या घरातील पहिलाच सोहळा असल्याने संपूर्ण कुटुंबीयांत आनंदाचे वातावरण होते. विवाह सोहळे बंदच्या वृत्ताने त्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. शिवाय नातेवाइकांचा रोष ओढवून घेण्यासारखी परिस्थिती आहे. एकास बोलावले, तर दुसऱ्यास राग अशा परिस्थितीत काय करावे कळत नाही. प्रशासनाने अशा नियोजित विवाह सोहळे असलेल्या वधूपक्षांची काळजी लक्षात घेता छोटेखानी विवाह सोहळे करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी होत आहे. 

हेही वाचा - काळजावर ठेवला दगड आणि शेतकऱ्याने उभ्या पिकात सोडली मेंढरे! स्वप्न चक्काचूर

 अवघ्या काही दिवसांवर सोहळा येऊन ठेपला आहे. तयारी पूर्ण झाली, काय करावे सुचेना नाही. बंदने मोठे संकट निर्माण झाले आहे. 
-आवेश शेख, वधूचा भाऊ 
 
कुटुंबातील पहिला विवाह असल्याने आनंदाचे वातावरण होते. प्रशासनाने विवाह सोहळे बंदच्या घोषणेने आनंद धुळीस मिळाला. 
-शरीफ शेख, वधूचे वडील