विविध भागातील रुग्णसंख्येनुसार कोविड सेंटरची रचना; विभागीय आयुक्तांच्या सुचना

नाशिक : ज्या भागात रुग्णसंख्या जास्त होती, अशा ठिकाणी कोविड सेंटरची निर्मिती करण्यात आली होती. परंतु, आता वेगवेगळ्या भागांतून रुग्णसंख्या आढळून येत असल्याने त्यानुसार कोविड केअर सेंटरची रचना करण्यात यावी, अशा सूचना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सोमवारी (ता. १५) दिल्या. 

विविध भागातील रुग्णसंख्येनुसार कोविड सेंटरची रचना 
गमे म्हणाले, की होम आयसोलेशनबाबत विशेष काळजी घेण्यात येणार आहे. लसीकरणाचा ड्राइव्हसुद्धा सुरू आहे. कोविड केअर सेंटर, डीसीएच, डीसीएसी यांची जी रचना मागच्यावेळी केली तशी रचना करावी. पोलिस विभागाने आपत्ती व्यवस्थापन कायदा निर्बंधची प्रभावी अंमलबजावणी स्वयंस्फूर्तीने करीत दैनंदिन अहवाल आपत्कालीन व्यवस्थापन केंद्राकडे पाठवावेत, अशा सूचना गमे यांनी दिल्या. 

हेही वाचा - रूम नंबर १०५ चे गुढ कायम; मुंबई-नाशिक हायवेवरील हॉटेलमधील घटना

जिल्हा लॅबची क्षमता पाच हजार 
मांढरे म्हणाले, की जिल्हा रुग्णालयातील लॅबची स्वॅब तपासणी क्षमता ८०० ची आहे. परंतु, स्वयंचलित मशिनमुळे स्वॅब टेस्टिंगची क्षमता पाच हजारांच्यावर जाणार आहे. बिटको हॉस्पिटलमधील लॅब २५ मार्चपूर्वी सुरू करण्यात येणार आहे. तिची क्षमता पाच हजार असेल. अशाप्रकारे दिवसाला दहा हजार नमुन्यांची तपासणी करू शकणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, गर्दीवर टाकण्यात आलेल्या निर्बंधांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे त्यात कोणतीही वाढ किंवा घट करण्यात येणार नाही. तसेच, मास्कच्या बाबतीत सुरवातीला मोठ्या प्रमाणात उदासीनता दिसून येत असल्याने एक हजार रुपये दंड करण्यात येत होता. आता हा दंड दोनशे रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या उल्लंघनाबाबत फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येणार असल्याचेही मांढरे यांनी स्पष्ट केले.  

हेही वाचा - सटाण्यात लहान मुले सातच्या आत घरात! रात्रीच्या विचित्र प्रकाराने दहशत; युवकांचा जागता पहारा

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अप्पर पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. कपिल आहेर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाच्या समन्वयक उपजिल्हाधिकारी वासंती माळी आदी उपस्थित होते.