विशालच्या यशाने गावालाही आनंदाश्रू! सेवकाच्या मुलाची उत्तुंग भरारी; होणार गावातील पहिला डॉक्टर

येवला (नाशिक) : एखाद्या विद्यार्थ्याने सर्व परीक्षेत प्रथम क्रमांक राखत मिळवलेले यश कुटुंबाला कौतुकास्पद असतेच; पण हाच मुलगा जेव्हा गुणवत्तेच्या जोरावर मेडिकल शिक्षणासाठी सहजरीत्या प्रवेश मिळवतो आणि गावातील पहिला डॉक्टर होण्याचे ग्रामस्थांचेही स्वप्न पूर्ण करतो तेव्हा नक्कीच उर भरून येतो. या आनंदात ग्रामस्थांनाही आनंदाश्रू आवरणे कठीण होते, असा आनंददायी प्रसंग अनुभवला तो देवदरी येथील ग्रामस्थांनी. 

कळवण तालुक्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण

समता प्रतिष्ठानच्या विद्यालयात सेवक म्हणून कार्यरत सर्वसामान्य कुटुंबातील लक्ष्मण दाणे यांचा विशाल हा मुलगा. गुणवत्ता, जिद्द व महत्त्वाकांक्षेच्या जोरावर आतापर्यंत सर्वच परीक्षेत त्याने देदीप्यमान यश मिळविले आहे. नुकत्याच झालेल्या बारावीच्या परीक्षेतही त्याने कळवण तालुक्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान मिळविला किंबहुना त्यानंतर झालेल्या नीट प्रवेश परीक्षेतही तो येवला तालुक्यात सर्वाधिक गुण मिळवून प्रथम आला आहे. याशिवाय नुकत्याच लागलेल्या एमएचटी-सीईटीचा निकालातही विशालने ९९.७९ पर्सेंटाइल मिळवत सर्वाधिक गुण मिळवले आहेत. अभिमानास्पद म्हणजे मेडिकलच्या स्वप्नपूर्तीसाठी लाखो रुपयेही कमी पडतात, तेथेच विशालची झालेली निवड कौतुकाची ठरली आहे. 

हेही वाचा >> खळबळजनक! तीन दिवसांपासून बेपत्ता तरुणाची थेट मिळाली डेड बॉडीच; कुटुंबाला घातपाताचा संशय

जन्मगावी या यशाचा आनंदोत्सव

एमबीबीएससाठी त्याची बिजे शासकीय मेडिकल महाविद्यालयात पहिल्याच फेरीत निवड झाली असून, त्याचा प्रवेश निश्चित झाला आहे. या वर्षी मेडिकलला जाणारा तालुक्यातील आतापर्यंत तो पहिलाच विद्यार्थी ठरला असून, जन्मगावी या यशाचा वेगळाच आनंदोत्सव साजरा झाला. गावातून सर्वसामान्य कुटुंबातील विशाल या स्पर्धेतही सहजगत्या प्रवेश मिळून डॉक्टर होणार असल्याने ग्रामस्थांनी त्याचा सत्कार केला. या वेळी त्यांच्या भावना व्यक्त करताना डोळ्यांतून अश्रूही तरळले. विशालने मिळवलेल्या यशाने सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, त्याच्या हुशारीवर सर्वजण कौतुकाची थापही देत आहेत. 

हेही वाचा >> बारा दिवस झुंजूनही अखेर सलोनीला मृत्यूने गाठलेच; मामाच्या गावी भाचीचा दुर्देवी अंत

पहिली ते पाचवीपासून विशालने सर्व वर्गात प्रथम क्रमांक मिळवला. दहावीलाही येथील जनता विद्यालयात तो प्रथम आला. ध्येयवादी व जिद्दी असलेल्या विशालने बारावीच्या परीक्षेतही कळवणमध्ये तर नीटमध्ये येवल्यात सर्वाधिक गुण मिळवले. मेडिकलसाठी प्रवेश घेण्याचे त्याचे स्वप्न होते ते पूर्ण झाल्याचा आनंद फक्त कुटुंबालाच नव्हे तर गावाला आणि अनेक हितचिंतकांनाही झाल्याचा अभिमान आहे. 
-लक्ष्मण दाणे, वडील