विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयात चोरीचा कारनामा; ४८ तासांच्या आत आवळल्या मुसक्या

नाशिक : विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयात चोरी करणाऱ्या तिघांच्या भद्रकाली गुन्हे पथकाने अवघ्या ४८ तासांच्या आत मुसक्या आवळल्या. त्यात एका अल्पवयीनचा समावेश आहे.

पोलीसांनी लावला सापळा

हवालदार अर्जुन खेलूकर यांच्या तक्रारीवरून भद्रकाली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकाराचे गांभीर्य ओळखत वरिष्ठ पोलिस निरीक्षक साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे पथकाने तपास चक्रे फिरविली. चोरीतील एक संशयित गंजमाळ येथे फिरत असल्याची गुप्त माहिती त्यांना मिळाली. सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्‍वर मोहिते, हवालदार भगवान जाधव, बंटी सय्यद, नाना जाधव, सचिन म्हसदे, प्रशांत भोई, साळुंके, राऊत यांनी रविवारी (ता. ६) दुपारी सापळा लावत अल्पवयीन संशयितास ताब्यात घेतले.

हेही वाचा>> उच्चशिक्षित दिव्यांग रामेश्वरचा संघर्ष! रेल्वे बंदमुळे फरफट; प्रशासकीय सेवेत अधिकारी बनायचे स्वप्न 

तीघे पोलिसांच्या जाळ्यात  ​

त्याची चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली देत अन्य दोघांची नावे सांगितली. पथकाने गंजमाळच्या पंचशीलनगर येथून भोलेनाथ सीताराम साळवे (वय २३) आणि किसन हरी जाधव (वय २०) यांना ताब्यात घेतले. सायंकाळी उशिरापर्यंत चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई सुरू होती. हवालदार चतुर तपास करीत आहेत. गडकरी चौकातील कार्यालयाच्या आवारातील वातानुकूलित यंत्राच्या तारा चोरीस गेल्याचे गेल्या शुक्रवारी (ता. ४) उघडकीस आले होते.

हेही वाचा >> एकुलत्या एक लेकाची जेव्हा निघाली अंत्ययात्रा; मटाणे गावावर शोककळा