विषमुक्त भाजीपाल्याची चळवळ! शेतकऱ्यांना चांगला भाव; महाराष्ट्राचे इतर राज्यातही अनुकरण

नाशिक : वर्षभर आहारात वापरल्या जाणाऱ्या भाजीपाल्याचे विषमुक्त उत्पादन होण्यासाठीची चळवळ महाराष्ट्रात मूळ धरू लागली आहे. आता शेतकऱ्यांना ‘अपेडा’च्या संकेतस्थळावरील ‘व्हेजनेट’मध्ये भाजीपाल्याची नोंद वर्षभर करता येईल, अशी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सुरवातीला त्यासाठी दोन पिकांचा समावेश होता. तो पुढे चौदा पिकांपर्यंत नेण्यात आला. आता ४३ पिकांचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे विषमुक्त भाजीपाल्याच्या चळवळीचे अनुकरण तमिळनाडू, गुजरात आणि उत्तर प्रदेशकडून सुरू आहे. 

विषमुक्त भाजीपाल्याची चळवळ  
महाराष्ट्राने द्राक्षांचे उत्पादन कीटकनाशकांचे उर्वरित अंशमुक्तीची चळवळ यशस्वी केली. त्यामुळे निर्यातीबरोबरच देशातंर्गतच्या ग्राहकांसाठी विषमुक्त द्राक्षे उपलब्ध होऊ लागली आहेत. ‘अपेडा’च्या संकेतस्थळावर ‘हॉर्टिनेट’ अंतर्गत द्राक्षे, डाळिंब, आंबा, भाजीपाला, लिंबूवर्गीय फळे, कांदा, इतर फळांची नोंदणी केली जाते. याशिवाय शेंगदाणा, मांस, बासमतीच्या निर्यातक्षम उत्पादनासाठी नोंदणी ऑनलाइन करण्याची सोय ‘अपेडा’च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महाराष्ट्राचे तमिळनाडूसह गुजरात अन् उत्तर प्रदेशकडून अनुकरण

‘हॉर्टिनेट’मध्ये महाराष्ट्रातील द्राक्षांच्या १६ हजार २१२ उत्पादकांनी नव्याने, तर २९ हजार १८१ उत्पादकांनी पुनर्नोंधणी केली आहे. कर्नाटकमधील १९० द्राक्ष उत्पादकांची नोंदणी झाली आहे. भाजीपाल्याच्या नोंदणीसाठी बीट, दुधीभोपळा, चवळी, काकडी, गाजर, वांगी, रंगीत ढोबळी मिरची, आले, शेवगा, मेथी, भेंडी, कच्ची केळी, बटाटा, दोडका, टोमॅटो आदींची नोंदणी शेतकरी करू शकतात. या नोंदणीच्या माध्यमातून भाजीपाल्याच्या उत्पादनाची ‘ट्रेसेब्लिटी’ करणे ग्राहकांना सहजशक्य झाले आहे. या नोंदणीतून शेतकऱ्यांमध्ये विषमुक्त भाजीपाल्याची उत्पादनाची जागृती झालेली असताना ग्राहकांना दर्जेदार भाजीपाला मिळणे शक्य झाले आहे. त्यातून शेतकऱ्यांना चार पैसे चांगला भाव मिळणे शक्य झाले आहे. 

हेही वाचा - रक्षेसाठी राखी बांधलेले हातच रक्ताने माखलेले! रक्षणकर्ता भाऊच बनला बहिणीसाठी काळ

महाराष्ट्रातील अडीच हजार शेतकरी सहभागी 
‘अपेडा’च्या ‘‘हॉर्टिनेट’मधील नोंदणीत महाराष्ट्रातील आतापर्यंत अडीच हजार भाजीपाला उत्पादक सहभागी झाले आहेत. गेल्या वर्षी एक हजार ८०० शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. यंदा ऑनलाइन नोंदणीसाठी पिकांची संख्या वाढलेली असताना वर्षभर नोंदणी करणे शक्य झाल्याने यंदा शेतकऱ्यांची संख्या अनेक पटीने वाढेल, अशी माहिती पुण्याच्या कृषी आयुक्तालयातील निर्यातक्षम शेतमाल उत्पादन विभागाचे तज्ज्ञ गोविंद हांडे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. कृषिपंढरी नाशिक जिल्ह्यासह पुणे, सोलापूर, ठाणे, सातारा, भंडारा, बीड, नगर, नंदूरबार, धुळे, जळगाव, उस्मानाबाद, अमरावती, अकोला जिल्ह्यांतील भाजीपाला उत्पादकांनी आतापर्यंत नोंदणी केली आहे. 

हेही वाचा - केवळ दैव बलवत्तर म्हणून बिबट्याच्या हल्ल्यातून वाचले बहिण-भाऊ; साक्षात मृत्यूच्या दाढेतून परतले

आकडे बोलतात 
(देशभरातील भाजीपाला उत्पादनाची स्थिती) 
० वर्षभरात निर्यात- पाच हजार कोटी रुपये 
० कांद्याची निर्यात- अडीच हजार कोटी रुपये 
० भाजीपाल्याची निर्यात- साडेतीन लाख टन 
० भाजीपाल्याची निर्यात होणारे देश-दुबई, अरब राष्ट्रे, युरोप, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ 

विमान भाड्यात दीडपट वाढ 
कोरोना विषाणू संसर्ग फैलावाच्या अनुषंगाने विमानांच्या फेऱ्या कमी झाल्या आहेत. त्याचवेळी कंटेनरच्या भाड्यात मोठी वाढ झाली आहे. या साऱ्या परिणाम म्हणजे, सध्यस्थितीत विमान भाड्यात दीडपटीने वाढ झाली आहे. तरीही भाजीपाला उत्पादकांनी ताजा भाजीपाला परदेशातील ग्राहकांपर्यंत पोचवून परकीय चलन मिळवण्याचे प्रयत्न सुरु ठेवले आहेत.