विहिरींनी गाठला तळ; तब्बल 8 ते 10 दिवसानंतर पाणीपुरवठा

चांदवड www.pudhari.news

पिंपळनेर, जि.धुळे : पुढारी वृत्तसेवा
साक्री शहरासह तालुक्यातील माळमाथा व काटवान परिसरात काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे या भागातील विहिरींनी तळ गाठल्याने टंचाईच्या झळा बसत आहेत. काही ग्रामपंचायतींच्या हद्दीत आठ ते दहा दिवसांनंतर पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांची हंडाभर पाण्यासाठी भटकंती होत आहे.

‌जिल्ह्यासह तालुक्यात यंदा अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने विहिरींची पाणी पातळी अपेक्षेप्रमाणे वाढलीच नव्हती. पावसाळा सुरू होण्यास अद्याप दोन ते अडीच महिन्यांपेक्षा अधिक कालावधी शिल्लक आहे. तर दुसरीकडे उन्हाची तीव्रता वाढताच शेतातील विहिरींनी तळ गाठायला सुरुवात केली आहे. काही शेतकऱ्यांच्या विहिरी कोरड्याठाक पडल्याने मका, ऊस, ज्वारी, गहू, कांदा, बाजरी आदी पिकांना पाणी देताना बळीराजाची कसरत होत आहे. काही शेतकऱ्यांच्या विहिरी जेमतेम तग धरून आहेत. पिकांना मुबलक पाणी मिळत नसल्याने हातातोंडाशी आलेल्या पिकांनी माना टाकल्या आहेत.

जमिनीतील पाण्याची पातळी कमी झाल्याने साक्री शहरात आठ ते दहा दिवसांनी पाणीपुरवठा होतो आहे. पाण्याच्या टँकरचे दर सातशे ते आठशे रुपये असल्याने सामान्य नागरिकांना टँकरचे पाणी परवडत नाही. त्यामुळे प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. – मनिषा पाटील, गृहिणी, साक्री.

उन्हाच्या तीव्रतेमुळे पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाली आहे. त्यामुळे पिकांना पाणी देणे कठीण होत आहे. – राजेंद्र खैरनार शेतकरी, चिकसे ता.साक्री.

हेही वाचा:

The post विहिरींनी गाठला तळ; तब्बल 8 ते 10 दिवसानंतर पाणीपुरवठा appeared first on पुढारी.