विहिरीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या युवतीचा दुर्दैवी अंत; परिसरात हळहळ

सोग्रस (नाशिक) : शिरसाने (ता. चांदवड) येथे विहिरीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या युवतीचा पाणी ओढताना तोल जाऊन विहिरीत पडल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (ता. १) सकाळी दहाच्या सुमारास घडली.

अशी आहे घटना

अर्चना जगन माळी (वय १७) असे मृत तरुणीचे नाव असून, ती शिरसाने येथील रमेश देशमाने यांच्या शेतातील गट नंबर २२८ येथे विहिरीवर कपडे धुण्यासाठी गेली होती. ती विहिरीत पडल्याची घटना आजूबाजूच्या ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी त्वरित पोलिसांना कळवून व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने तिला बाहेर काढले. घटनास्थळी पोलिस येताच त्यांनी अर्चनास उपचारासाठी चांदवड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले केले. तीस तपासले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत म्हणून घोषित केले. दुपारी चारच्या सुमारास शिरसाने येथील स्मशानभूमीत तिच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.

या घटनेसंदर्भात शिरसाने पोलिसपाटील सचिन घुले यांनी वडाळीभोई पोलिस ठाण्यात माहिती दिली. मृत अर्चना ही अतिशय गरीब कुटुंबातील असून, तिच्या कुटुंबाची परिस्थिती अतिशय हलाखीची आहे. शासनाने या कुटुंबास आर्थिक मदत करावी, अशी मागणी शिरसाने ग्रामपंचायतीचे कर्मचारी योगेश केदारे व पोलिसपाटील सचिन घुले यांनी केली आहे. तिच्या पश्चात एक भाऊ, एक बहीण आणि आई, वडील असा परिवार आहे.

हेही वाचा > क्रूर नियती! तो' एक सेल्फीचा मोह अनावर; अन् माऊली लेकरांपासून दुरावली कायमची