विहिर कामगार नव्हे, होती मोटारसायकल चोरट्यांची टोळीच; ग्रामीण पोलिसांकडून चोरीचे रॅकेट उघड

येवला (नाशिक) : विखरणी व मालेगाव येथील तरुणांनी राजस्थानमधील विहीर कामगारांच्या मदतीने जिल्ह्यात तयार केलेले मोटारसायकल चोरीचे रॅकेट उघडकीस आणले. यात चोरी केलेल्या २० मोटरसायकल हस्तगत केल्या आहेत. पोलीसी खाक्या दाखविताच चोरट्यांनी गुन्हयाची कबुली दिली.

पोलीसी खाक्या दाखविताच दिली कबुली...

जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी जिल्हयातील वाढत्या मोटर सायकल चोरीचे गुन्हयांबाबत सविस्तर माहीती घेऊन कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार तालुक्यातील काही संशयित चोरीच्या मोटरसायकल बनावट नंबर प्लेट लावून विक्री करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यावरून शांताराम घुगे, रावसाहेब कांबळे, इम्रान पटेल, प्रविण काकड, भाउसाहेब टिळे, विशाल आव्हाड यांच्या पथकाने विखरणी परिसरात सापळा रचून संशयित हसन उर्फ गोटया रशिद दरवेशी (वय १९, रा. विखरणी) याला ताब्यात घेतले. त्याच्या घराजवळ लपवुन ठेवलेल्या विनानंबर प्लेटच्या मोटर सायकलींबाबत विचारपुस केली असता त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली. मात्र पोलीसी खाक्या दाखविताच त्याने मालेगाव येथील साथीदार खलील उर्फ कालु अहमद निहाल अहमद (वय ३७, रा.नयापुरा मुशार्वत चौक), अनिसु रहेमान अन्सारी (वय ४२,रा.गोल्डनननगर) यांच्यासोबत मालेगाव, चांदवड, येवला, कोपरगाव,
अहमदनगर, पाचोरा भागातून मोटार सायकली चोरी केल्याची कबुली दिली.

जिल्ह्यातील २० गाड्या हस्तगत

यातील आरोपी खलील अहमद व अनिसु रहमान अन्सारी यांना मालेगाव शहरातुन ताब्यात घेण्यात आले. या तीनही आरोपींनी राजस्थान राज्यातील साथीदार रमजान मन्सुरी व सद्याम मन्सुरी दोघे (रा.छपरा जि.भिलवाडा) यांच्या मदतीने नाशिक जिल्हयातील बहुतांश भागामध्ये मोटारसायकल चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. तीन आरोपी व त्यांचे राजस्थान राज्यातील साथीदार हे विहींरीचे कामासाठी जिल्हयातील विविध ठिकाणी वास्तव्यास होते. त्या सर्वांनी मिळुन वर्दळीच्या ठिकांणावर पाळत ठेवुन मोटारसायकल चोरी केल्या असुन कमी किंमतीचे दारात बनावट नंबर प्लेट तयार करून विक्री करत असल्याचे उघड झाले आहे.

हेही वाचा > आडगावला व्यापाऱ्याला पाच लाखांचा गंडा! ११० क्विंटल लोखंडाच्या मालाचा अपहार

साथीदारांचा कसोशीने शोध सुरु

अटक केलेल्या तिन्ही आरोपीच्या कब्जातुन ६ बजाज प्लटीना, ४ हिरो एच एफ डिलक्स, २ टिव्हीएस स्पोर्ट, २ बजाज डिस्कवर, २ स्पलेंडर, १ बजाज सीटि, १ हिरो आय स्मार्ट, १ होंडा ड्रिम युगा, १ अव्हिएटर अशा एकुण ४ लाख २६ हजार किमतीच्या २० मोटार हस्तगत केल्या आहे. सदर आरोपींनी दिलेल्या कबुलीनुसार येवला तालुका, आझादनगर, कोपरगाव शहर, अहमदनगर तालुका, पाचोरा पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेले मोटरसायकल चोरीचे ७ गून्हे उघडकीस आले आहे. सदर आरोपींना जप्त मुददेमालासह येवला तालुका पोलीस ठाणे हजर करण्यात आले असुन मोटर सायकल चोरीचे मोठे रॅकेट उघडकीस आणले आहे. राजस्थान येथील साथीदारांचा पोलीस पथक कसोशीने शोध घेत आहे.

हेही वाचा > दुर्देवी! वडिलांनाच पाहावा लागला पोटच्या मुलाच्या मृत्यूचा थरार; पायाखालची जमीनच सरकली