वीजखोळंब्याचा रब्बी हंगामात अडथळा! मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसह ग्रामस्थ हैराण

निमगाव (जि.नाशिक) : गेल्या वर्षी झालेल्या समाधानकारक पावसाने यंदा मालेगाव तालुक्यात खरिपाचे क्षेत्र वाढले आहे. सरासरीच्या तब्बल १७३ टक्के पेरणी झाली आहे. गव्हाच्या क्षेत्रात दुपटीने वाढ झाली आहे. निमगाव परिसरातील दुष्काळी पट्ट्यासह संपूर्ण तालुक्यात उन्हाळ कांद्याचे विक्रमी उत्पादन घेतले जात आहे.

मुबलक पाणी असले तरी विजेचा लपंडाव रब्बीच्या उत्पन्नाला अडसर येऊ शकेल. पंधरा दिवसांपासून वीज उपकेंद्रांमधील बिघाड, कमी दाबाने पुरवठा यासह थकबाकीमुळे वीजजोडणी खंडित करण्यात आल्याने पाणी असूनही ते रब्बी पिकांना देता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. 

मुबलक पाण्याने यंदा उन्हाळ कांदा व रब्बीची पिके जोमात आहेत. विहिरींना अजूनही चांगले पाणी आहे. निमगाव उपकेंद्रातून १५ गावांना वीजपुरवठा केला जातो. मनमाड वीज केंद्रातून ३३ केव्हीऐवजी फक्त २० केव्ही वीजपुरवठा होत आहे. पंधरा दिवसांपासून कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने अनेक ठिकाणी वीजपंप सुरू होत नाहीत. मनमाड वीज केंद्रातून १३२ केव्ही तारा टाकल्या आहेत. त्या जीर्ण झाल्याने वारंवार बिघाड होतो. हीच परिस्थिती तालुक्यातील काटवन व माळमाथा भागात दिसून येते. मध्यंतरीच्या काळात थकीत बिलांमुळे शेती वीजपंपांचा पुरवठा खंडित करण्यात आला. कृषिमंत्री दादा भुसे यांनी तंबी दिल्यानंतर अधिकाऱ्यांनी तो पूर्ववत केला. 

विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम 
दुष्काळी पट्ट्यातील निमगावसह परिसरात विजेची समस्या कायमची झाली आहे. उपकेंद्रांमध्ये नेहमी बिघाड होतो. निमगाव परिसरात आठ ते दहा दिवसांपासून वीज वारंवार गायब होत आहे. हातातोंडाशी आलेले रब्बी पिकाचे उत्पन्न अंतिम टप्प्यात आले असताना विजेच्या लपंडावामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. शिवाय शेतमळ्यांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर मोठा परिणाम होत आहे. 

हेही वाचा - एक विलक्षण प्रेम! बाभळीच्या झाडात अडकलेल्या साथीदारासाठी लांडोराची घालमेल; पाहा VIDEO

निमगावसह जाटपाडे, निंबायती, मेहुणे जेऊर, पाथर्डी, ज्वार्डी, चौकटपाडे अशा बहुतांश गावांत पुरेशा दाबाने वीजपुरवठा होत नाही. त्यामुळे शेतकरी व नागरिक कंटाळले आहेत. याप्रश्‍नी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे. 
-डॉ. मनोज हिरे, ग्रामपंचायत सदस्य, निमगाव 

आठ ते दहा दिवसांपासून वीज कर्मचारी अहोरात्र दुरुस्तीचे काम करीत आहेत. तारा अतिशय जीर्ण झाल्याने एका ठिकाणी जोडणी केली, तर दुसरीकडे तार तुटत आहे. लांब पल्ल्याचे अंतर असल्याने कायम वीजगळतीला सामोरे जावे लागते. मनमाडऐवजी सायने वीज केंद्रातून जोडणी केली तर अंतर कमी होऊन अडचण निर्माण होणार नाही. 
-अमित शिसोदे, सहाय्यक अभियंता, निमगाव 

मालेगाव तालुक्यातील रब्बीचे पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये) 
पिकाचे नाव सर्वसाधारण क्षेत्र प्रत्यक्ष पेरणी टक्केवारी 
ज्वारी - ५३ ३३६ ६३३ 
गहू - ४०४१ ८३५९ २०६ 
मका - ७३० १६७१ २२८ 
हरभरा - ३२४७ ३४९५ १०७ 
------------------------------------------------ 
एकूण रब्बी - ७९८२ १३८६१ १७३ टक्के  

 

हेही वाचा - झटपट श्रीमंतीच्या मोहात तरुणाई गुन्हेगारीकडे! द्राक्षनगरीत फोफावतेय भाईगीरीचे वेड