वीजबिलांची थकबाकी ७१ हजार कोटींवर! लॉकडाउन काळात २० हजार कोटींची वाढ 

नाशिक : महावितरण कंपनीच्या वीजबिलांच्या थकबाकीचा आकडा ७१ हजार कोटींवर पोचला आहे. थकीत वीजबिल वसुलीकडे कानाडोळा केला जात असताना गेल्या वर्षभरात लॉकडाउन काळात वीजबिलांच्या माफीच्या चर्चा आणि घोषणांमुळे तब्बल वर्षभरात २० हजार कोटींची थकबाकी वाढली आहे. 

राज्यात सरकार कुठल्याही पक्षाचे असले, तरी थकबाकी वसुलीबाबत कायमच बोटचेपी भूमिका घेतली गेली. त्यात, प्रामाणिकपणे वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांचा विचारच होत नसल्याने हे चित्र निर्माण झाले. थकबाकीचा डोंगर वाढत असताना मागील वर्षापासून कोरोना लॉकडाउन सुरू झाला. लॉकडाउनच्या काळात सगळी अर्थव्यवस्था ठप पडली असताना याच काळात वीज कंपनीने एप्रिलपासून सुरू केलेल्या वाढीव वीजबिलांमुळे गोंधळ झाला. राज्यात आक्रोश वाढत असताना वीज कनेक्शन कापले जाणार नाही या घोषणामुळे वसुली बंद आणि थकबाकीचा डोंगर वाढत चालला आहे. सामान्य ग्राहकांचे बिल थकले म्हणजे दोन महिन्यांत कनेक्शन तोडणाऱ्या यंत्रणेला मात्र मोठ्या थकबाकीदारांच्या थकबाकी वसुलीविषयी कुणीही विचारणारे नाही. 

हेही वाचा - सख्ख्या भावांची एकत्रच अंत्ययात्रा पाहण्याचे आई-बापाचे दुर्देवी नशिब; संपूर्ण गाव सुन्न 

टोलवाटोलवीचे राजकारण 

वीजबिल थकबाकीच्या विषयावर शासकीय, प्रशासकीय पातळीवर टोलवाटोलवी चालते. प्रशासकीय यंत्रणा प्रभावी नसल्याने आणि त्यात, भ्रष्टाचार असल्याचा राजकीय नेतेमंडळींचा आरोप आहे, तर वीजबिल माफीच्या लोकप्रिय घोषणा आणि वीज कनेक्शन तोडण्यासाठी पोलिस बंदोबस्त मिळत नाही. हे धोरणात्मक विषय कारणीभूत असल्याची कामगार संघटनांची तक्रार आहे. एकूणच या टोलवाटोलवीत वीजबिलांच्या 
थकबाकीचा डोंगर मात्र वाढतच चालला असून, प्रामाणिक वीजग्राहकांवर त्याचा बोजा वाढत आहे. 

हेही वाचा - पहिल्‍या दिवशी पॉझिटिव्ह कोरोना रिपोर्ट; दुसऱ्या दिवशी निगेटिव्ह! हा तर जिवासोबत खेळ 

आर्थिक वर्ष थकबाकी 

२०१३-१४ १४,१५४ कोटी 
२०१४-१५ १६,५२५ कोटी 
२०१५-१६ २१,०५९ कोटी 
२०१६-१७ २६,३३३ कोटी 
२०१७-१८ ३२,५९१ कोटी 
२०१८-१९ ४१,१३३ कोटी 
२०१९-२० ५१,१४६ कोटी 
डिसेंबर २०२० ७१,५०६ कोटी