वीज केंद्रातील ९० टक्के मजुरांची पगारवाढ नावालाच; कामगारांकडून चौकशीची मागणी

एकलहरे (जि.नाशिक) : नाशिक औष्णिक वीज केंद्रातील बोनस व काहीअंशी पगारवाढ मिळाल्याने कंत्राटी कामगारांची दिवाळी उत्साहात झाली. पण पगारवाढ अल्प झाल्याने कामगार आगीतून फुफाट्यात आला आहे. 

‘बोनस तर सोडाच, किमान वेतनही मिळेना’ या शीर्षकाखाली ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यावर दिवाळीच्या दोन दिवस आधी, तर काही कंत्राटी कंपन्यांनी नंतर कामगारांना सात हजार पगार व काहीअंशी पगारवाढ दिल्याने कामगारांत आनंदाचे वातावरण होते. पण अद्यापही दहा टक्के ठेकेदारांनी पगारवाढ दिली नसून ज्यांनी दिली आहे, ती वाढ फक्त तोंडाला पाने पुसणारी आहे. 

 प्रत्यक्षात पगारवाढ नाही..

कंत्राटी कामगाराला परिपत्रकानुसार कुशल कामगाराला एक हजार ४४ हजेरी मिळावयास हवी, अर्धकुशल कामगारास ९८०, तर अकुशल ८६० रुपये रोजंदारी मिळावयास हवी. दिवाळीनंतर ज्यांनी पगारवाढ दिली, ती ३०० ते ३५० रुपयांवरून वाढवून ५७० ते ६४० पर्यंत अल्प वाढ दिली. मातब्बर मंडळींनी अद्याप एवढीही वाढ दिली नसल्याचे समजते. नाशिक वीज केंद्रातील बाहुबली समजल्या जाणाऱ्या कंत्राटदाराने त्याच्या काही कंत्राटी कामगारांकडून वीस टक्के पगारवाढ व भत्ते मिळतात, असे लिहून घेतले आहे. परंतु प्रत्यक्षात पगारवाढ केलेली नाही, याची माहिती व्यवस्थापनालाही आहे. याची ग्राउंड लेवलवर चौकशी केली पाहिजे, अशी बहुतांश कामगारांची मागणी आहे. 

हेही वाचा >> मनाला चटका लावणारी बातमी! माऊलीच्या नशिबी दोनदा दफनविधी अंत्यसंस्काराचा योग; जुळली मुलांशी झालेली ताटातूट

आयुक्तांनी चौकशी करावी 

एक कंत्राटी कामगारास दोन-तीन विभागात काम करून एकच विभागाचा पगार मिळतो, जिथे शंभर-सव्वाशे मजुरांचे काम आहे, तिथे अवघ्या ३५ ते ४० मजुरांकडून काम करवून घेतले जाते. याची कामगार आयुक्तांनी सखोल चौकशी करून न्याय देण्याची कामगारांची मागणी आहे. 

हेही वाचा >> बळीराजाच्या नशिबी दुर्दैवच; जेव्हा स्वत:च्याच डोळ्यादेखत संसाराची राखरांगोळी होते तेव्हा..