वीर जवान सूरज चौबे अमर रहे! हजारोंच्या उपस्थितीत अखेरचा निरोप

चांदवड www.pudhari.news

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा

‘भारत माता की जय, वंदे मातरम, हिंदुस्थान जिंदाबाद, अमर रहे अमर रहे, वीर जवान सूरज अमर रहे’च्या जयघोषात चांदवडचे भूमिपुत्र सूरज उल्हास चौबे (३३) यांच्यावर गुरुवारी (दि. १२) अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सूरजची पत्नी, चार वर्षांचा मुलगा, वडिलांनी टाहो फोडल्याने उपस्थित हजारो नागरिकांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहात होत्या.

चांदवड शहराचे भूमिपुत्र सूरज हे भारतीय सैन्य दलात हरियाणा राज्यातील अंबाला येथे लान्स नायक पदावर कार्यरत होते. प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान बुधवारी (दि. ११) सकाळी त्यांचे निधन झाले. याबाबत शहरात माहिती कळताच तालुक्यात शोककळा पसरली होती. चौबे कुटुंबीयांनी रात्र सूरज यांच्या आठवणीत जागून काढली. गुरुवारी (दि. १२) सूरजचे पार्थिव येताच त्यांची पत्नी, वडील, बहिणीने सुरजच्या नावाचा टाहो फोडला. सुरजचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या घरी ठेवण्यात आले होते.

 

चांदवड www.pudhari.news
चांदवड : येथील भूमिपुत्र सुरज चौबे यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेताना पत्नी शिवानी, मुलगा नक्ष व कुटुंबीय.

सकाळी ११ वाजता फुलांनी सजविलेल्या रथातून शहरातून त्याची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी ‘भारत माता की जय, वंदे मातरम, अमर रहे अमर रहे वीर जवान सुरज अमर रहे’च्या जयघोषाने शहर दुमदुमले होते. अंत्ययात्रा वरचे गाव, लोहार गल्ली, रंगमहाल, शिवनेरी चौक, श्रीराम रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, सोमवार पेठ, आठवडे बाजार, बसस्थानक, पेट्रोलपंप चौफुली, मुंबई-आग्रा महामार्गाने शनी मंदिराजवळील स्मशानभूमीत नेण्यात आली. यावेळी सुरज यांच्या दर्शनासाठी हजारोंचा जनसमुदाय लोटला होता. दरम्यान, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार तसेच डॉ. आत्माराम कुंभार्डे, नितीन आहेर, भूषण कासलीवाल, नायब तहसीलदार मीनाक्षी गोसावी, पोलिस निरीक्षक समीर बारवकर, सहायक गटविकास अधिकारी सुनील पाटील, नाशिक आर्टिलरी सेंटरचे नायब सुभेदार डी. विमल व त्यांच्या ११ सहका-यांनी सुरजला श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी बाळासाहेब वाघ, मनोज शिंदे, सुनील शेलार, कारभारी आहेर, पिंटू संचेती, अशोक गायकवाड, अशोक व्यवहारे, मोहन शर्मा, विजय सांबर, राम बर्वे, गणेश वाघ, संतोष सुतारे, गुड्डू खैरनार आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चांदवड www.pudhari.news
चांदवड : फुलांनी सजविलेल्या रथातून शहरातून सूरज उल्हास चौबे यांच्या अंत्ययात्रेत लोटलेला जनसमुदाय. (सर्व छायाचित्रे : सुनील थोरे).

हेही वाचा:

The post वीर जवान सूरज चौबे अमर रहे! हजारोंच्या उपस्थितीत अखेरचा निरोप appeared first on पुढारी.