वीस रुपयांच्या नाण्याला ‘ना ना’! मुबलक चिल्लरमुळे नाण्याऐवजी नोटेलाच भाव

नाशिक रोड : हलके, टिकाऊ आणि वैशिष्ट्यपूर्ण असे वीस रुपयांचे नाणे बाजारात आले आहे. मात्र त्याला कोणी स्वीकारत नसल्याने नागरिकांनी वीस रुपयांच्या नाण्याकडे पाठ फिरविली आहे. 

दहा वर्षांपूर्वी दहाचे नाणे बाजारात आणल्यानंतर सरकारने वीसचे नाणे बाजारात आणले. मुंबई, कोलकता, नोएडा, हैदराबादच्या टाकसाळीत नाणी तयार होतात. मुंबई टाकसाळेने वीसची नाणी तयार केली असून, ती रिझर्व्ह बॅंकेला चलनात आणण्यासाठी सुपूर्द केली आहेत. वीसच्या नोटेनंतर वीसचे नाणे चलनात आणण्याचे सरकारने मार्च २०२० मध्ये घोषित केले होते. लॉकडाउनमुळे त्याला विलंब झाला. मात्र आता नाशिकला स्टेट बॅंकेसह अन्य बॅंकांत ही नाणी दाखल झाली आहेत. परंतु अनेक दिवस होऊनही त्यांना मागणीच नाही. टोलनाका, मोठे व्यापारी, किराणा दुकानदार, मेडिकल दुकानदार यांना बॅंका नाणी कटवत आहेत. 

हेही वाचा > अखेर गूढ उकललेच! म्हणून केली रिक्षाचालकाने 'त्या' गर्भवती महिलेची हत्या

अशी आहेत नाणी 

पाच व दहाच्या नाण्यापेक्षा किंमत जास्त असूनही ती हलकी आहेत. ही नाणी ८.५४ ग्रॅमची असून, बारा कोनांची आहेत. व्यास २७ मिमी आहे. नाण्याची कडा निकेलची, तर मध्य हा तांब्याचा आहे. झिंकचाही वापर केला आहे. ६५ टक्के तांबे, १५ टक्के झिंक, २० टक्के निकेलचा यात वापर केला आहे. सुटी नाणी मिळत नसल्याने पूर्वी वाद होत असे. आता नाण्यांचा पाऊस पडू लागल्याने त्यांची विल्हेवाट लावायची कशी, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. बाजारातून पन्नासचे नाणे गायब झाले आहे. सध्या एक, दोन तसेच पाच आणि दहाची नाणी आहेत. तेवढ्याच किमतीच्या नोटाही आहेत. नोटांचे वजन कमी, तर नाण्यांचे वजन जास्त असल्यानेळे खिसा जड होतो. त्यामुळे नाण्यांना मागणी कमी आहे. बॅंकांकडे दहा व पाचच्या नाण्यांची रास लागली आहे. त्यात आता वीसची भर पडली आहे. 

हेही वाचा > वाढदिवशीच दोघा मित्रांवर काळाची झडप; 'तो' प्रवास ठरला अखेरचाच

२० हजारांची घ्यावी लागते चिल्लर 

चिल्लरसाठी जागा नसल्याने दिवसाला एका ग्राहकाकडून शंभर रुपयांपर्यंतच चिल्लर काही बॅँका स्वीकारत आहेत. बॅंकेत खाते आहे तेथेच चिल्लर जमा करण्याचा सल्ला काही बॅंका देतात. बॅंका ग्राहकांना मुबलक चिल्लर उपलब्ध करत आहे. किमान ५० हजार व त्याच्या पटीत चिल्लरसाठी आग्रह धरतात. दोन रुपयांच्या नाण्यांची पाचशेची, पाच रुपयांच्या नाण्यांची साडेबारा, तर दहा रुपयांच्या नाण्यांची वीस हजाराची बॅॅग घ्यावी लागते.