वेगाने मृत्यू नको; उपाययोजना हवी

अपघात

एक शून्य शून्य : गौरव अहिरे

स्वप्न उराशी बाळगून प्रवासी गाढ झोपेत होते. काही कळायच्या आत जोरात आवाज आला आणि चहुबाजूंनी आगीने वेढल्याचे चित्र होते. त्यातच 12 जणांचा होरपळून मृत्यू झाला. हे अवघ्या काही क्षणात झाले. ही घटना ज्या वेगाने घडली त्या घटनेलाही वेगच कारणीभूत ठरला. वाहनांच्या वेगामुळे काही क्षणात होत्याचे नव्हते होते आणि कोणाला जीव गमवावा लागतो तर कोणाला जीवलग व्यक्ती! एकीकडे अपघात कमी करण्यासाठी प्रशासन अनेक उपाययोजना करत आहेत, मात्र वाहनांच्या वेगामुळे या उपाययोजनांचा अपेक्षित परिणाम दिसत नसल्याचे चित्र आहे.

औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरची जवळील सिग्नलवर आयशर ट्रक आणि खासगी बसमध्ये झालेल्या अपघातानंतर बसला आग लागली व त्यात 12 जणांचा होरपळून मृत्यू झाला. या अपघाताची केंद्रीय पातळीपर्यंत दखल घेण्यात आली. सिग्नल न पाळणे, वेगावर नियंत्रण नसणे, इतर वाहनांचा अंदाज न घेणे, झोपेवर नियंत्रण नसल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला. हीच कारणे इतर अपघातांनाही लागू पडतात. बहुतांश अपघातांमध्ये वाहनाचा वेग हे कारण समोर आले आहे. त्यामुळे वेगावर स्वार होताना अनेकांना जीव गमवावा लागत असल्याचे किंवा कायमचे अपंगत्व येत असल्याचे वास्तव आहे. प्रशासनाकडून प्रत्येक अपघातांची कारणमीमांसा केली जाते. त्यावरून अपघात प्रवण क्षेत्रांचा अभ्यास करून अपघात कमी कसे होतील याकडेही लक्ष दिले जाते. त्यामुळे अपघात व अपघाती मृत्यूंचे प्रमाणही कमी झाल्याचे दिसते. त्यानुसार ग्रामीण भागात 2019मध्ये एक हजार 1246 अपघातांमध्ये 783 जणांचा मृत्यू झाला होता. सप्टेंबर 2022 पर्यंत 982 अपघातांमध्ये 635 जणांनी जीव गमवला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील अपघातांची भीषणता कायम असल्याचे दिसते. तर शहरात 2017 मध्ये 206, 2018 मध्ये 217, 2019 साली 183, 2020 साली 164 जणांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यानंतर 2021 मध्ये 191 व चालू वर्षात 139 जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरात अपघाती मृत्यूंचे प्रमाण कमी होत असल्याचे सकारात्मक चित्र आहे. मात्र, अपघाती मृत्यूंचे आकडे दोन आकडी करण्यावर व कालांतराने शून्य करण्यावर भर दिला जात असताना दुसरीकडे वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष व वेगावर नियंत्रण नसल्याने आकडेवारी कमी होत नसल्याचे दिसते. औरंगाबाद रोडवरील अपघातानंतर खासगी वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. स्लीपर कोचच्या 30 आसनी बसमध्ये तब्बल 55 जण प्रवास करताना समोर आले. त्यामुळे खाली बसलेले किंवा दाटीवाटीने बसलेल्या प्रवाशांना जीव गमवावा लागल्याचे समोर आले. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतुकीचे चित्र सर्वत्र दिसते. त्यामुळे सुरक्षिततेच्या उपाययोजना निष्प्रभ ठरतात आणि जीवितहानी मोठ्या प्रमाणात होते. वाहतूक नियमांचे पालन न केल्याने व वेग मर्यादा न राखल्याने होणार्‍या अपघातांमुळे अनेक संसार कोलमडले असून, ‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ याप्रमाणे इतरांनी तरी योग्य खबरदारी घेत वाहतूक नियम पाळल्यास, सुरक्षिततेसाठी असलेले निकष पूर्ण केल्यास व वेगावर नियंत्रण ठेवल्यास अपघातांसह अपघाती मृत्यूंचे प्रमाण कमी होण्यास आणखी बळ मिळेल यात शंका नाही.

हेही वाचा:

The post वेगाने मृत्यू नको; उपाययोजना हवी appeared first on पुढारी.