वेदनेवर फुंकर घालणारे श्रामणेर शिबिर

श्रामनेर www.pudhari.news

नाशिक : सर्किट : चंद्रमणी पटाईत

सध्याची स्थिती पाहता, प्रत्येकाचं जीवन फास्ट झालं आहे. लाइफ स्टाइल बदलली आहे. जो तो भौतिक सुखामागे धावताना दिसत आहे. माणूस ‘बाल्या-बाली आणि चार बाय चारच्या खोली’च्या धबडग्यात स्वत:चे वेगळे अस्तित्व समाजात टिकवण्यासाठी केविलवाणी धडपड करत आहे. चार पैसे कमावून आपला संसार थाटत तो फुलवण्यासाठी जिवाच्या आकांताने प्रयत्नांची पराकाष्टा करत आहे. मात्र, या सार्‍या प्रपंचात माणूस स्वत:चं आयुष्य चिंतेत आणि मानसिक विकारांच्या गर्तेत पाडत आहे. सुख-शांती आणि समाधानाने जगण्याच्या नादात स्वत:ला इत्तरांपासून दूर लोटून घेऊ लागला आहे. परंतु, मन:शांती असली, तरच इतर कोणतेही उपद्व्याप अथवा स्वप्न साकार करण्यासाठी तो झगडू शकतो, हेच दुर्दैवाने मनुष्यप्राणी विसरत चालला आहे, हा चिंतनाचा विषय ठरू पाहात आहे.

भगवान तथागत गौतम बुद्ध यांनी दु:खाचे कारण ‘तृष्णा’ सांगितले आहे. मग ही तृष्णा आर्थिक, भावनिक, शारीरिक, मानसिक कोणतीही असू शकेल. जर मनुष्यात तृष्णाच राहिली नाही, तर तो कधीही दु:खी होऊ शकत नाही. दु:ख निवारण केल्यास प्रत्येकाच्या जगण्यात सुख, समाधान आणि शांतता नक्कीच येणार, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. मात्र, सारेच तृष्णाग्रस्त असल्याने, एकही व्यक्ती पूर्णपणे सुखी आहे, असे म्हणता येणार नाही. सध्या प्रत्येक जण सुखाच्या मागेच धावताना दिसतो. त्यामुळे त्याची शांती हरवलेली दिसते. मात्र, यातून वेळ काढून मनाला गारवा मिळावा, या सार्‍या मोह-मायेतून दूर जावे आणि जगण्याच्या मार्गातील काटे संयमाने दूर सारता यावेत तसेच बुद्धांनी सांगितलेल्या समता, शांती आणि एकतेचा संदेश देणार्‍या विचारधारेत स्वत:ला गुंतवून समतेच्या वाटेचे पाईक होत सामाजिक, आध्यात्मिक किंवा धार्मिक कार्यात स्वत:ला झोकून दिले अथवा त्यात आपलाही हातभार लावला, तर प्रत्येकाला ‘अच्छे दिन’ नक्कीच येतील, यात शंकाच नाही. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 जयंती, धर्मांतर घोषणा वर्धापन दिन आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या औचित्याने नाशिक नगरीत, महाश्रामणेर शिबिर तसेच महाबौद्ध धम्म मेळावा घेण्यात येत आहे. ही बाब नाशिककरांसाठी अभिमानास्पद समजता येईल. एकीकडे राज्यातील राजकारण, समाजकारण, धर्मकारण, वाढती गुन्हेगारी, धर्मांधता, व्यसनाधिकता, कुप्रथांचे उच्चाटन पाहता, हे सारं कुठे थाबांवं, असं प्रत्येकालाच वाटू लागलं आहे. यावर अंकुश ठेवणं आणि स्वच्छ मनाने समस्यांवर मात करण्याची कला महाश्रामणेर शिबिरांच्या माध्यमातूनच मिळू शकते. कारण श्रामणेर शिबिरात जगण्याचं शास्त्र शिकविलं जातं. भगवान बुद्ध यांनी सांगितलेल्या करुणेच्या मार्गाने जाण्यासाठी दिशा दिली जाते. बुद्धांनी सांगितलेली चार आर्यसत्य, पंचशील आणि अष्टांग मार्गांच्या अनुकरणाची महती यातून सांगितली जाते. त्यामुळे स्वत:ला मनःशांती तर लाभतेच याशिवाय इतरांना मदतीसाठी पुढे येण्याची, गरजूंसाठी मदतीचा आधार होण्याची ऊर्मीही अशा शिबिरांमधून मिळते. देशात माजत असलेल्या अराजकतेला बुद्धांचा शांतता, समता आणि करुणेचा विचारच तारू शकणार आहे, याची जाणीव यातून करून दिली जाते. ‘ज्याने प्रेमाने जिंकले जगा असा वीर गौतम’ आहे, हे आपण गाण्यातून ऐकले असले, तरी या वीराचा वारसदार होण्याची पात्रताही अशा शिबिरांतून होत असते. त्यामुळे अ.भा. समता सैनिक दल व भारतीय बौद्ध महासभा व बीएमए ग्रुप यांच्या वतीने महाबौद्ध धम्म मेळावा आणि महाश्रामणेर शिबिराचे आयोजन दि. 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबरपर्यंत गोल्फ क्लब मैदानावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सहभाग घेतला अथवा शिबिरात श्रामणेर झालं, तर वेदनादायी आयुष्यावर यातून नक्कीच गारवा देणारी फुंकर मिळेल, हे निश्चित!

हेही वाचा:

The post वेदनेवर फुंकर घालणारे श्रामणेर शिबिर appeared first on पुढारी.