वैद्यकीयच्‍या राष्ट्रीय स्‍तरावरील कोट्याच्‍या अर्जात तांत्रिक अडचणी; पालक-विद्यार्थ्यांची तक्रार

नाशिक : सध्या सुरू असलेल्‍या वैद्यकीय अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया राज्‍य व राष्ट्रीय स्‍तरावरील कोटा अशा दोन स्‍तरांवर पार पडत आहे. यापैकी राष्ट्रीय स्‍तरावरील पंधरा टक्‍के जागांच्‍या प्रवेशप्रक्रियेत सहभागी होण्यासाठी ऑनलाइन नोंदणीप्रक्रिया सुरू आहे. मात्र, या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरण्यात तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ‘नीट’मध्ये चांगले गुण मिळवूनही राष्ट्रीय कोट्यातून प्रवेशापासून विद्यार्थ्यांना मुकावे लागण्याची शक्‍यता आहे. 

सहाय्यता क्रमांकावर प्रतिसाद नाही

ऑल इंडिया कोटा स्‍तरावरील जागांच्‍या प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया २८ नोव्‍हेंबरपासून सुरू झाली होती. शनिवार (ता. ५)पर्यंत ही मुदत असून, बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस या आयुष कोर्सच्या प्रवेशासाठी विद्यार्थी प्रवेश अर्ज सादर करीत आहेत. परंतु, अर्ज भरताना तांत्रिक अडचणी उद्‌भवत असल्‍याचे काही विद्यार्थी व पालकांचे म्‍हणणे आहे. ऑनलाइन स्‍वरूपात फॉर्म सबमिट न होणे, नोंदणी प्रक्रिया राबविल्‍यानंतर शुल्‍क अदा करण्याच्‍या प्रक्रियेत अडचणी उद्‌भवणे अशा स्‍वरूपाच्‍या अडचणी येत आहेत. यासंदर्भात तांत्रिक सहाय्यतेसाठी सीईटी सेलने उपलब्‍ध केलेल्‍या सहाय्यता क्रमांकावर संपर्क साधल्‍यास तेथूनही प्रतिसाद मिळत नसल्‍याचे तक्रारकर्त्या विद्यार्थ्यांचे म्‍हणणे आहे. 

हेही वाचा > नियतीची खेळी! लेकाला जेवण घेऊन माऊली आली शेतात; आणि घरी घडले भलतेच

बुधवारी पहिली निवड यादी 

बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस या शिक्षणक्रमांसाठी ऑनलाइन प्रेफरन्‍स फॉर्म भरण्यासाठी येत्या सोमवार (ता. ७)पर्यंत अंतिम मुदत आहे. सध्याच्‍या वेळापत्रकानुसार ९ डिसेंबरला पहिली निवडयादी जाहीर होणार आहे, तर प्रवेश निश्‍चितीसाठी प्रक्रिया राबविण्यासाठी १९ डिसेंबरपर्यंत मुदत असणार आहे.  

हेही वाचा > क्रूर नियती! तो' एक सेल्फीचा मोह अनावर; अन् माऊली लेकरांपासून दुरावली कायमची