वैद्यकीय अभ्यासक्रमांच्‍या परीक्षा पुढे ढकलल्या; कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे निर्णय

नाशिक : महाराष्ट्र आरोग्‍य विज्ञान विद्यापीठांतर्गत वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या हिवाळी हंगाम २०२० च्‍या लेखी परीक्षा सध्या सुरू आहेत. तीन टप्प्यांत होत असलेल्‍या या परीक्षांतील पहिले दोन टप्पे पूर्णत्‍वाकडे येत असताना, तिसऱ्या टप्प्‍यातील परीक्षा मात्र कोरोनामुळे प्रभावित झाल्‍या आहेत.

प्रथम, द्वितीय, तृतीय वर्षातील पदवी, पदव्‍युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्‍या २३ मार्चपासून नियोजित परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. आता या परीक्षा १९ एप्रिलपासून घेतल्या जाणार आहेत. परीक्षेचे सुधारित वेळापत्रक सोमवारी (ता. १५) जारी केले जाणार आहे. 

आरोग्‍य विज्ञान विद्यापीठाच्‍या हिवाळी २०२० हंगामातील परीक्षांचा पहिला टप्पा ४ जानेवारीपासून सुरू झाला होता. या टप्प्‍यात सर्व प्रकारच्‍या पदव्‍युत्तर पदवी अभ्यासक्रमाची परीक्षा घेण्यात आली, तर दुसऱ्या टप्प्‍याला ८ मार्चपासून सुरवात झाली आहे. या टप्प्‍यात पदवी अभ्यासक्रमांच्‍या अंतिम वर्षाच्‍या लेखी परीक्षा घेतल्‍या जात आहेत. तिसऱ्या टप्प्‍यात येत्‍या २३ मार्चपासून पदवी अभ्यासक्रमांच्‍या प्रथम, द्वितीय, तृतीय वर्षाच्‍या अभ्यासक्रमांच्‍या लेखी परीक्षा नियोजित होत्‍या; परंतु राज्‍यात विविध जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्‍हा वाढू लागल्‍याने तिसऱ्या टप्प्‍यातील परीक्षा पुढे ढकलल्‍या जात आहेत. प्रथम व द्वितीय वर्ष परीक्षांमध्ये उन्‍हाळी २०२० परीक्षांचे काही विद्याशाखांची निकाल प्रक्रिया सुरू आहे. विद्यापीठ संलग्‍न महाविद्यालयांमध्ये कोरोना पॉझिटिव्‍ह विद्यार्थ्यांची वाढती संख्या या गोष्टी लक्षात घेता परीक्षा पुढे ढकलत असल्‍याचे पत्रकात नमूद केले आहे. या परीक्षेचे सुधारित वेळापत्रक सोमवारी विद्यापीठाच्‍या संकेतस्‍थळावर जाहीर केले जाणार असल्‍याचेही स्‍पष्ट केले आहे.  

 हेही वाचा - दुर्दैवी अपघात आणि महापालिका कर्मचाऱ्याचे अख्खे कुटुंब उध्वस्त; ५ वर्षीय चिमुरडा ठार, पत्नी गंभीर