वैद्यकीय परीक्षांबाबत लवकरच निर्णय; वैद्यकीय शिक्षणमंत्री देशमुख यांनी जाहीर केली भूमिका 

नाशिक : कोरोनाच्‍या प्रादुर्भावामुळे विविध परीक्षा प्रभावित होत आहेत. मात्र महाराष्ट्र आरोग्‍य विज्ञान विद्यापीठातर्फे नुकतेच परिपत्रक जारी करत नियोजित वेळापत्रकानुसार येत्‍या १९ एप्रिलपासून परीक्षा घेणार असल्‍याचे स्‍पष्ट केले होते. मात्र राज्‍यभरातील गंभीर परीस्‍थिती लक्षात घेता वैद्यकीय शिक्षणक्रमाच्‍या परीक्षांसंदर्भात योग्‍य निर्णय लवकरच जाहीर करणार असल्‍याची भूमिका वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी मांडली आहे. अंतिम वर्ष वगळता अन्‍य वर्षांतील परीक्षांचे फेरनियोजन करण्याचे संकेत त्‍यांनी दिले आहेत. 

अडचणींचा सकारात्मकपणे विचार करू

महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठातर्फे दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्‍या कार्यक्रमात  देशमुख यांनी वैद्यकीय शाखेतील विद्यार्थ्यांशी तसेच विविध वैद्यकीय शाखेतील विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी, अधिसभा सदस्यांशी संवाद साधला. प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, कुलसचिव डॉ. के. डी. चव्हाण, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक संदीप कुलकर्णी आदी उपस्‍थित होते. 
डॉ. वैष्णवी किराड, आशिष मोहोर आदी विद्यार्थी प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांच्या सध्याच्या स्थितीतील अडचणींविषयी माहिती दिली. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाने विविध निर्बंध लागू केले आहेत. अजून हे निर्बंध अधिक कडक करण्याची शक्यता लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यास अडचणी येतील. या अडचणींचा सकारात्मकपणे विचार करू, यापूर्वीच यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली असून, यानंतर पुन्हा त्यांच्याशी चर्चा करून योग्य ती भूमिका घेणार असल्याचेही वैद्यकीय शिक्षणमंत्री देशमुख यांनी सांगितले. 

हेही वाचा - सदैव हसतमुख 'मुस्कान' कायमची हिरावली; भावा पाठोपाठ बहिणीच्या मृत्यूने कुटुंबावर मोठा आघात

नॅशनल मेडिकल कौन्सिलने अंतिम वर्ष वैद्यकीय शाखेच्या परीक्षा वेळेवरच घेण्याच्या सूचना सर्वच राज्यांना दिल्या आहेत. त्यानुसार अंतिम वर्षाच्या परीक्षांचे आयोजन होईल. मात्र द्वितीय, तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांच्या मागणीसंदर्भात अडचणी लक्षात घेता निर्णय घेतला जाणार आहे. 

विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून परीक्षा घेण्याची आमची भूमिका नाही. कुलपती तथा राज्यपाल, मुख्यमंत्री, नॅशनल मेडिकल कौन्सिल, केंद्रीय आरोग्य मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण विभाग या सर्वांशी चर्चा करून परीक्षा घेण्यासंदर्भात तत्काळ निर्णय घेतला जाईल. 
- अमित देशमुख, वैद्यकीय शिक्षणमंत्री 

हेही वाचा - काळजी घ्या! नाशिकमध्ये रस्त्याने चालता-बोलता सहा जणांचा मृत्यू